‘रोड सेफ्टी बिला’च्या विरोधात आज बंद
By Admin | Published: April 29, 2015 11:52 PM2015-04-29T23:52:57+5:302015-04-30T00:22:47+5:30
एक एस.टी. संघटना सहभागी : दोन संघटना कामावर; आठ रिक्षा संघटना निषेध करणार
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ‘रोड ट्रान्स्पोर्ट आणि सेफ्टी बिल २०१४’ या नव्या कायद्याविरोधात आज, गुरुवारी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. राज्यातील एस.टी. कामगार संघटनांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे; तर राष्ट्रवादी एस. टी. कामगार, काँग्रेस व मनसे परिवहन सेनेच्यावतीने बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक संघटना बंदमध्ये, तर दोन संघटना कामावर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एस.टी. कामगार संघटना हा बंद आमचा संघटनेच्या कामगारांच्या पगारवाढीसाठी नाही, तर एस.टी. वाचविण्यासाठी आहे. रोड सेफ्टी बिलामुळे एस.टी.चे खासगीकरण होणार आहे. याचा फटका सामान्य जनतेला होणार आहे. याबाबत सामान्य लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा एकदिवसीय बंद पुकारलेला आहे. त्या ‘बंद’मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा बंद यशस्वी करावा, असे आवाहन विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी एस.टी. कामगार कॉँग्रेस संघटना केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाहतूक धोरणाला आमचा विरोध आहे. मात्र, आज होणाऱ्या देशव्यापी संपामध्ये राष्ट्रवादी एस. टी. कामगार काँग्रेस संघटना सहभागी होणार नाही. प्रस्तावित वाहतूक धोरणाबाबत आम्ही पूर्वीच तीव्र विरोध दर्शविला आहे. मात्र, सध्या एस. टी. महामंडळाचा गर्दीचा हंगाम सुरू आहे. तरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासदांनी संपात सहभागी न होता प्रशासनास सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन राष्ट्रवादी एस. टी. कामगार काँग्रेसचे सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी केले आहे.
मनसे परिवहन सेना प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही संपात सहभागी होणार नाही. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ‘मनसे’च्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी संपात सहभागी होऊ नये, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
आठ रिक्षा संघटना बंदमध्ये नाहीत
आज होणाऱ्या राज्यव्यापी रिक्षा, टॅक्सी बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय कोल्हापुरातील आठ रिक्षा संघटनांनी घेतला असून, केवळ केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यटनासाठी देशभरातून दररोज हजारो प्रवासी कोल्हापुरात येतात. त्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये व रिक्षाचालकांचा व्यवसाय फक्त दोन महिनेच होतो. त्यामुळे चालकांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याकरिता केवळ निषेध व्यक्त केला जाणार आहे, असे पत्रक कोल्हापूर जिल्हा आॅटो रिक्षा संघर्ष समितीच्यावतीने सुभाष शेटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.