सराफ व्यावसायिकांचा बंद
By admin | Published: February 10, 2016 11:39 PM2016-02-10T23:39:48+5:302016-02-11T00:31:34+5:30
पॅन कार्ड सक्तीला विरोध : सुमारे दहा कोटींची उलाढाल ठप्प
कोल्हापूर : दोन लाख रुपयांवरील सोने-चांदीच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने पॅन कार्डाची सक्ती तसेच अन्य काही जाचक नियम केले आहेत. त्याच्या विरोधात बुधवारी कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांनी ‘बंद’ पाळला. यामुळे सुमारे दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या नेतृत्वाखाली हा बंद पाळण्यात आला.
या ‘बंद’बाबत कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी सांगितले की, केंद्र सरकारने दोन लाख रुपयांवरील सोने-चांदीच्या खरेदीसाठी पॅन कार्ड तसेच अर्ज क्रमांक ६० आणि ६१ भरून घेणे सक्तीचे केले आहे. शिवाय सहा वर्षे अशी कागदपत्रे सांभाळूनही ठेवावी लागणार आहेत. काळा पैसा रोखण्यासाठी हे पाऊल सरकारने उचलले असले तरी, त्याचे तोटे अधिक आहेत. पॅन कार्ड नसलेल्या ग्राहकांना दोन लाखांवर सोने खरेदी करता येणार नाही. सराफ व्यवसाय कोलमडून पडणार आहे. त्यातून सराफ व्यवसायातील कारागीर, कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. हे टाळण्यासाठी या जाचक नियमांविरोधात सराफ बाजार बुधवारी बंद ठेवण्यात आला. शहरात सराफ व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून गुजरीत निदर्शने केली. शिवाय निषेधफेरी काढली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली निदर्शने करण्यात आली. यात बाबा महाडिक, राजेश राठोड, कुलदीप गायकवाड, किरण गांधी, धर्मपाल जिरगे, विजयकुमार भोसले, संजय पाटील, कुमार दळवी, हिम्मत ओसवाल, दिनकर लाळगे, मनोज राठोड, नागेश मंत्री, आदी सराफ व्यावसायिक सहभागी झाले होते. दरम्यान, या ‘बंद’मुळे सराफ बाजारात शुकशुकाट पसरला होता. (प्रतिनिधी)
केंद्र सरकारने केलेल्या पॅन कार्ड सक्तीचा विरोध म्हणून आम्ही व्यावसायिकांनी बुधवारी दुकाने बंद करून शासनाचा निषेध केला आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये स्थानिक संघटनांनी निदर्शने करून केंद्र शासनाचा निषेध केला. तहसीलदारांना निवेदन दिले. - सुरेश गायकवाड,
अध्यक्ष, कोल्हापूर सराफ
व्यापारी संघ
पॅन कार्डाच्या सक्तीमुळे दि. १ जानेवारी २०१६ पासून ३० टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे. तसेच बुधवारच्या बंदमुळे शहर व जिल्ह्यातील एकूण सराफ व्यवसायातील साधारणत: दहा कोटींच्या उलाढाली ठप्प झाल्या. पॅन कार्ड सक्तीसह अन्य जाचक अटी रद्द कराव्यात, ही व्यावसायिकांची मागणी आहे. ती मान्य होईपर्यंत शांततेच्या मार्गाने आमचा लढा सुरू राहील.
- भरत ओसवाल, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ