कोल्हापूरात सराफ बाजार बंद
By admin | Published: March 2, 2016 11:04 PM2016-03-02T23:04:51+5:302016-03-02T23:55:32+5:30
१० कोटींची उलाढाल ठप्प : वाढीव अबकारी कराचा निषेध
कोल्हापूर : सोन्याचे दागिने उत्पादनावर लावलेल्या १ टक्के अबकारी कराच्या निषेधार्थ पुकारलेल्या तीन दिवस देशव्यापी संपाला कोल्हापूर जिल्ह्यातून पाठिंबा व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. त्यामुळे जिल्ह्यातील सराफ बाजारपेठेत एका दिवसात सुमारे १० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे व्यावसायिकांतून सांगण्यात आले. या संपामुळे गुजरी, भेंडे गल्ली, राजारामपुरी परिसरात सराफ व्यावसायिकांत शुकशुकाट पसरला होता. जिल्ह्यातील सुमारे ३५०० सराफ व्यावसायिक संपात सहभागी झाले आहेत.
केंद्राच्या अर्थसंकल्पात सोन्याचे दागिने उत्पादनावर १ टक्के अबकारी कर लावला आहे. हा कर अन्यायी असल्याने त्याला विरोध करण्यासाठी आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनच्यावतीने देशव्यापी सराफ व्यावसायिकांना ‘बंद’ची हाक दिली आहे. त्यासाठी कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि जिल्हा सुवर्णकार व्यावसायिकांनी मंगळवारी सायंकाळी अचानक बैठक घेऊन देशव्यापी संपास पाठिंबा देण्यासाठी बुधवारपासून तीन दिवस व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळपासूनच सर्व सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी आपली दुकाने न उघडता ‘बंद’मध्ये सहभाग घेतला. सराफ व्यावसायिकांवर व्हॅट, आयकर, गुमास्ता कर, घरफाळा कर, आदी विविध कर लादल्याने हा व्यवसाय यापूर्वीच अडचणीत आहे. त्यात आता या अर्थसंकल्पात नव्याने जादा एक टक्का अबकारी कर लावल्याने त्याचा व्यवसायावर परिणाम होणार आहे.