कापड भरलेला ट्रक जळाला
By admin | Published: February 5, 2016 12:42 AM2016-02-05T00:42:10+5:302016-02-05T00:51:56+5:30
इचलकरंजीतील घटना : ६० लाख रुपयांचे नुकसान
इचलकरंजी : येथील सीईटीपी रिंगरोडवर कापडाच्या गाठीने भरलेल्या ट्रकला मध्यरात्री अचानक आग लागली. यामध्ये सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. या आगीत २१४ गाठी जळाल्या असून, आग नेमकी कशामुळे लागली, हे मात्र समजू शकले नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील हणमंतसिंग उदयसिंग राजपुरोहित यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. शिवशक्ती लॉजिस्टिक या नावाने त्यांचे जुना चंदूर रोडवर कार्यालय आहे. या ठिकाणी बुधवारी सायंकाळी एमएच १० झेड २३२२ या अमोल टाकळे यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये ग्रे कापडाच्या २१४ गाठी भरण्यात आल्या होत्या. हा ट्रक गुरुवारी पहाटे अहमदाबादकडे रवाना होणार होता. त्यासाठी रात्री त्यांच्या सांगली रोडवरील घराजवळ बीग बझारनजीक हा ट्रक लावण्यात आला होता. मात्र, पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास या ट्रकला अचानकपणे आग लागली. कापडाच्या गाठीमुळे आग पसरून धुराचे लोट पसरू लागले. ही घटना काहींच्या लक्षात येताच त्यांनी पुरोहित यांना या घटनेची कल्पना दिली. त्यांनी अग्निशामक दलाला माहिती कळविली. अग्निशामक दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. मात्र, या दुर्घटनेत २१४ कापडांच्या गाठी जळाल्याने सुमारे ६० लाखांचे नुकसान झाले. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (वार्ताहर)