‘आनंदवन’साठी कपडे, धान्य रवाना
By admin | Published: November 4, 2015 10:08 PM2015-11-04T22:08:19+5:302015-11-05T00:01:23+5:30
माने प्रतिष्ठानचा उपक्रम : आदिवासी, कुष्ठरोगी बांधवांना मदतीचा हात
शिरोळ : येथील दलितमित्र डॉ. अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने दिवाळीनिमित्त सलग सातव्या वर्षीही गडचिरोली जिल्ह्यातील आनंदवन व हेमलकसा मधील आदिवासी व कुष्ठरोगी बांधवांसाठी एक ट्रक धान्य व नवीन वस्त्र रवाना झाले. शिरोळ येथे वाहनाचे पूजन गुरुदत्त कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी तहसीलदार सचिन गिरी होते.येथील छत्रपती चौकातून वस्त्रदान व धान्य रवाना करण्यात आले. पाच टन धान्य व नवीन ट्रकभर कपडे जमा झाले होते.
दलितमित्र डॉ. अशोकराव माने म्हणाले, दानशूर व्यक्ती व संस्थांनी वस्तुरूपाने मदत केली. त्यामुळे पाच टन धान्य व नवीन कपडे असा एक ट्रक रवाना होत आहे. वाहनचालक दत्तात्रय खरात यांनी सलग सात वर्षे सामाजिक सेवेत योगदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार गुरुदत्तचे अध्यक्ष घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, गटविकास अधिकारी राहुल देसाई, पोलीस निरीक्षक वसंत बागल, रावसाहेब देसाई, सुनील इनामदार, बजरंग काळे, उपसरपंच पृथ्वीराज यादव, शिवाजीराव देशमुख, रेखा जाधव, मदनावली चौगुले, स्नेहल कुलकर्णी, रेखा कांबळे, नलिनी देसाई, रेखादेवी माने, दयानंद जाधव, बबनराव बन्ने, डी. आर. पाटील, सागर कोळी, संदीप चव्हाण, नागेश हिरेमठ उपस्थित होते. विजय खातेदार यांनी स्वागत केले. दगडू माने यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)