मेघप्रणव पोवारच्या लघुपटाची ‘इफ्फी’मध्ये निवड, कोल्हापूरच्या कलावंतांची हॅट्ट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 07:15 PM2018-11-01T19:15:19+5:302018-11-02T11:59:20+5:30
गोव्यात २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदा दोन मराठी चित्रपटांची आणि सर्वाधिक आठ मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात झालेली आहे. यात कोल्हापूरच्या मेघप्रणव पोवार याच्या लघुपटाचा समावेश आहे. ‘इफ्फी’त निवड होण्याचे हे सलग तिसरे वर्ष असल्यामुळे कोल्हापूरच्या कलावंतांनी हॅट्ट्रिक साधली आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : गोव्यात २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदा दोन मराठी चित्रपटांची आणि सर्वाधिक आठ मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात झालेली आहे. यात कोल्हापूरच्या मेघप्रणव पोवार याच्या लघुपटाचा समावेश आहे. ‘इफ्फी’त निवड होण्याचे हे सलग तिसरे वर्ष असल्यामुळे कोल्हापूरच्या कलावंतांनी हॅट्ट्रिक साधली आहे.
या महोत्सवात विविध भाषांतील एकूण २२ चित्रपट आणि २१ लघुपट इंडियन पॅनारोमा या विभागात दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये पुण्याच्या निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित आम्ही दोघी हे दोन पूर्ण लांबीचे मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यंदा प्रथमच मराठीतील सर्वाधिक आठ लघुपट येथे दाखविण्यात येत आहेत.
मेघप्रणव पोवार कोल्हापूरचा
मेघप्रणव बाबासाहेब पोवार हा कोल्हापूरचा कलावंत. पुण्याच्या एफटीटीआयआयमधून दिग्दर्शन अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी एफटीटीआयआय निर्मित ‘हॅपी बर्थ डे’ या लघुपटाला उत्कृष्ट कौंटुंबिक मूल्यांसाठीचा भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याच लघुपटाची यंदाच्या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. २६ नोव्हेंबर रोजी गोव्यात हा लघुपट दाखविण्यात येणार आहे.
सलग तिसऱ्या वर्षी कोल्हापूरची हॅट्ट्रिक
गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपला चित्रपट प्रदर्शित व्हावा, ही अनेक कलावंतांची इच्छा असते. त्यामुळे २०१६ मध्ये उमेश बगाडे याचा ‘चौकट,’ २०१७ मध्ये अजय कुरणे याचा ‘बलुतं’ आणि आता यावर्षी मेघप्रणव पोवार याचा ‘हॅपी बर्थ डे’ या लघुपटाचे प्रदर्शन या महोत्सवात होत असल्यामुळे कोल्हापूरच्या कलावंतांच्या कलाकृतीचे हे सलग तिसरे वर्ष आहे. यामुळे चित्रपट क्षेत्रातील युवा कलावंतांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कलावंतांची आंतरराष्ट्रीय भरारी
कोल्हापूरच्या मयूर कुलकर्णी याचा ‘भवताल’ हा लघुपट याच महोत्सवात सर्वप्रथम दाखविण्यात आला होता. याशिवाय २०१६ मध्ये त्याला ‘इफ्फी’चा भाग असलेल्या ‘फिल्म बाजार’मध्ये पटकथेसाठीही शिष्यवृत्ती मिळाली होती. २०१७ मध्ये करण चव्हाण आणि विक्रम पाटील यांच्या ‘इमेगो’ या पूर्ण लांबीच्या चित्रपटाचाही फिल्म बाजारमध्ये समावेश होता. यंदा हा चित्रपट मुंबईच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही दाखविण्यात आला.