उदगाव स्मशानाची धग थांबता थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:25+5:302021-05-15T04:21:25+5:30
शुभम गायकवाड उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीकाठी वैकुंठधाम आहे. त्याठिकाणी उदगावसह सहा ते सात गावच्या मयतांना ...
शुभम गायकवाड
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीकाठी वैकुंठधाम आहे. त्याठिकाणी उदगावसह सहा ते सात गावच्या मयतांना अग्नी दिला जातो; परंतु कोरोनामुळे मृत्यूसंख्येत वाढ होत असल्याने दररोज १५ ते २० जणांवर अंत्यसंस्कार होत आहेत. या परिस्थितीमुळे उदगाव स्मशानाची धग थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने वैकुंठधामात वाढीव शवदाहिनी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
कृष्णा नदीसाठी असलेल्या वैकुंठधामात कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव, जयसिंगपूर, चिपरी बेघर, संभाजीपूर, धरणगुत्ती, मौजे आगर, तर सांगली जिल्ह्यातील अंकली, धामणी येथील नागरिकांवर कायमस्वरूपी अंत्यसंस्कार केले जातात, तर उदगाव व मौजे आगर येथील शासकीय कोविड सेंटर व जयसिंगपूर परिसरातील दहाहून अधिक कोविड रुग्णालयांतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवरदेखील याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर बळी जात असून, वैकुंठधामात जागा उपलब्ध होत नसल्याने रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाइकांवर येत आहे.
अंत्यसंस्कारावेळी वापरत असलेले मास्क, पीपीई किट त्याठिकाणीच फेकून दिले जात असल्याची परिस्थिती आहे. सध्या याठिकाणी फक्त सहा शवदाहिन्या असून, क्षमतेपेक्षा जादा अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे उदगाव ग्रामपंचायतीने वाढीव शवदाहिन्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
फोटो - १४०५२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ-
उदगाव (ता. शिरोळ) येथे जागा उपलब्ध नसल्याने स्मशानशेडबाहेर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाइकांवर येत आहे.