ढगफुटीसदृश पावसाने शेती गेली वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:25+5:302021-07-26T04:23:25+5:30
यवलूज : खुपिरे (ता. करवीर) येथील गुरुकी हद्दीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश धुवाधार पावसाने यवलूज (ता. पन्हाळा) ...
यवलूज : खुपिरे (ता. करवीर) येथील गुरुकी हद्दीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश धुवाधार पावसाने यवलूज (ता. पन्हाळा) येथील उभ्या पिकासहित शेती वाहून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चिले कुटुंबीयांचे खुपिरे हद्दीतील गुरुकी नावाच्या हद्दीतील गट नं १८९२ मधील डोंगरमाथ्याखाली शेती आहे. त्यामध्ये त्यांनी उसाची लागवड केली असून, पीकदेखील आले होते; पण दोन दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे काही वेळातच डोंगरमाथ्यावरून गोळा झालेल्या तीव्र पाण्याचा प्रवाह थेट चिले यांच्या उसातून वाहत गेला. पाण्याच्या प्रचंड वेगामुळे जमिनीला मोठे भगदाड पडले. काही वेळातच बघता-बघता त्या ठिकाणी १५ फूट खोल व २० फूट रुंद असे खोलगट पात्र तयार होऊन जमिनीची माती काही अंतरावर असलेल्या विहिरीत वाहत गेल्यामुळे विहिरीचे अस्तित्व मिटून गेले आहे. या भूस्खलनामुळे पांडुरंग चिले, प्रभाकर चिले, सुरेश चिले, तुकाराम चिले, दिनकर चिले, विठ्ठल चिले, नंदू चिले यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे महसूल विभागाने तत्काळ या घटनेचा पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो-खुपिरे (ता. करवीर) येथील गुरुकी हद्दीत असलेल्या शेतात ढगफुटीसदृश पावसामुळे शेतातील उभे ऊस पीक वाहून गेले असून, तेथे असे भलेमोठे पात्र तयार झाले आहे.
२५ खुपिरे शेती