कोल्हापुरात गेली दोन दिवस ढगाळ वातावरण अन् रात्रीची हुडहुडी, वातावरणात कमालीचे बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 12:13 PM2023-01-05T12:13:51+5:302023-01-05T12:15:21+5:30
रविवारनंतर किमान तापमान १३ डिग्रीपर्यंत खाली येणार असल्याचा अंदाज
कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण राहिले आहे. सकाळपासून आकाश गच्च होते. दिवसभरात आकाश ढगाळ राहिले तरी रात्रीच्या वेळी थंड वाऱ्यामुळे अंगात हुडहुडी राहते. आज, गुरुवारपर्यंत असेच हवामान राहील, असा अंदाज आहे.
यंदा वातावरणात कमालीचे बदल होत आहेत. थंडी, पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिले आहे. मागील आठवड्यात थंडी जोर पकडत असतानाच गेले दोन दिवस ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे किमान तापमानात वाढ होत जाऊन ते १८ डिग्रीपर्यंत पोहोचले. कमाल तापमानही ३१ डिग्रीपर्यंत राहिल्याने दिवसभर उष्माही जाणवतो.
आज असेच वातावरण राहणार असून उद्या, शुक्रवारपासून आकाश स्वच्छ राहणार आहे. किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होणार असल्याने थंडीही वाढणार आहे. रविवारनंतर किमान तापमान १३ डिग्रीपर्यंत खाली येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.