कोल्हापुरात दिवसभर ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 07:02 PM2020-09-14T19:02:29+5:302020-09-14T19:04:09+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर आकाश गच्च राहिले.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर आकाश गच्च राहिले.
गेल्या आठवड्यात रोज पाऊस कोसळत होता. रविवारपासून पाऊस कमी असला तरी ढगाळ वातावरण कायम आहे. रविवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण राहिले. काही तालुक्यात हलक्या सरी कोसळल्या. कोल्हापूर शहरात मात्र दिवसभर आकाश गच्च होते. दुपारनंतर वाऱ्याची झुलूक जाणवू लागली. त्याचबरोबर भुरभुरही सुरू होती.
सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यास सरासरी ४.३३ मिली मीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक २०.५० मिली मीटर पाऊस झाला.
धरणक्षेत्रातही पाऊस कमी आहे, तुरळक सरी कोसळत असल्याने राधानगरी धरणाच्या सांडव्यातून प्रतिसेकंद १२८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात एका खासगी मालमत्तेची किरकोळ पडझड होऊन सुमारे तीन हजाराचे नुकसान झाले. भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने अद्याप या मार्गावरील वाहतूक बंद आहे.
आज, मंगळवारपासून दोन दिवस सकाळी काही काळ ऊन पडले. मात्र, त्यानंतर दुपारी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.