लिफ्ट आदळल्याने गोंधळ
By Admin | Published: February 9, 2016 12:51 AM2016-02-09T00:51:16+5:302016-02-09T00:55:54+5:30
न्यायसंकुलातील प्रकार : आठ माणसांची क्षमता असताना १८जण उभारले
कोल्हापूर : कसबा बावडा येथील न्यायसंकुलामधील पहिल्या क्रमांकाच्या लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जादा लोक उभारल्याने ती अचानक तिसऱ्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर येऊन आदळली. भीतीने लोक आरडाओरडा करू लागल्याने गोंधळ उडाला. काही वेळाने लिफ्टचा दरवाजा उघडल्याने सर्वजण सुखरूप बाहेर आले. यामध्ये सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. आठ लोकांची क्षमता असताना त्यामधून १८ लोक निघाले होते.
कसबा बावडा येथे ५६ कोटी रुपये खर्चून दिमाखदार अशी चार मजली न्यायसंकुलाची
इमारत बांधली आहे. या नव्या ‘न्यायसंकुला’चे उद्घाटन रविवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश विजया ताहिलरमाणी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. सोमवारी नव्या न्यायालयातील कामकाजाचा पहिला दिवस होता. सकाळी दहापासून न्यायाधीश, कर्मचारी, वकील, पक्षकार, पोलीस आदींची वर्दळ सुरूहोती.
इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच डाव्या व उजव्या दिशेला चार लिफ्ट आहेत. ही लिफ्ट न्यायालयीन कर्मचारी, वकील व पक्षकारांसाठी ठेवली आहे. लिफ्टबाहेर आठ लोकांची क्षमता असलेला फलक लावला आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास लिफ्ट (उद्दवाहन) क्रमांक १ मधून वकील, पक्षकार, पोलीस असे एकूण १८ लोक वरती निघाले. लिफ्ट तिसऱ्या मजल्यापर्यंत गेली आणि अचानक हळूहळू खाली आली. तळमजल्यावर लिफ्टला स्प्रिंग असल्याने ती त्यावर येऊन जंप झाल्याने उंचावर जाऊन परत खाली आदळली. आतील लोक भीतीने ओरडू लागल्याने गोंधळ उडाला. कुणालाच काय झाले हे कळेना. लिफ्टमधील काही लोक लिफ्टची बटने दाबू लागल्याने दरवाजा बराच वेळ उघडला नाही. काही वेळाने तो आपोआप उघडला. त्यानंतर आतमध्ये अडकलेले लोक बाहेर आले आणि मोकळा श्वास घेतला. लिफ्टमध्ये काही महिलाही होत्या. त्यांना तर भीतीने घाम फुटला होता. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच सार्वजनिक बांधकाम कार्यालयातील विद्युत विभागाचे शाखा अभियंता अमोल डांगे, सहायक अभियंता अतुल जकाते घटनास्थळी आले. त्यांनी लिफ्टची पाहणी केली असता लिफ्ट सुस्थितीत असल्याचे दिसून आले. क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने ही लिफ्ट खाली आली. (प्रतिनिधी)
स्वयंचलित लिफ्ट
न्यायसंकुलामध्ये एकूण आठ लिफ्ट आहेत. चार न्यायाधीशांसाठी, तर न्यायालयीन कर्मचारी, वकील, पक्षकारांसाठी चार लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत.
लिफ्ट मुंबईच्या प्राईम इलेव्हेंट या कंपनीने बसविल्या आहेत. सर्वच लिफ्ट अॅटोमॅटिक आहेत. क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यास त्या हळूहळू खाली येतात. लोकांनी भीतीने लिफ्टची बटने दाबल्याने हा गोंधळ उडाल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. 3
लिफ्टमेन नाही
आठ लिफ्टमध्ये फक्त दोनच लिफ्टमेन (चालक) आहेत. अन्य सहा लिफ्टमध्ये लिफ्टमेन नाही. त्यामुळे लिफ्टमधून ये-जा करणाऱ्या लोकांना हाताळण्याचे ज्ञान नसल्याने हा प्रकार घडला आहे. न्यायालयीन प्रशासन जोपर्यंत लिफ्टमेन नियुक्त करीत नाहीत, तोपर्यंत त्या बंद ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे दुपारपासून या लिफ्ट बंद होत्या.