‘सीपीआर’मधील परिचारिकांचा बेमुदत बंद
By admin | Published: August 4, 2015 12:34 AM2015-08-04T00:34:33+5:302015-08-04T00:34:33+5:30
आरोग्यसेवेवर जाणवला परिणाम : महिन्याच्या एक तारखेला पगार, सेवानिवृत्त परिचारिकांना आर्थिक लाभ देण्याची मागणी
कोल्हापूर : परिचारिकांचे पगार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस व्हावेत, सेवानिवृत्त झालेल्या परिचारिकांना सर्व आर्थिक लाभ मिळावेत, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर)मधील परिचारिकांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे आरोग्यसेवेवर काही प्रमाणात परिणाम जाणवला.राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार थकीत (मे २०१५ पासून) आहेत. याबाबत महाविद्यालय प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत आहे. अनेक वर्षांपासून सीपीआरमधील परिचारिकांचे पगार शासन निर्णय असूनदेखील महिन्याच्या एक तारखेला होत नाहीत. पगाराच्या स्लिप दिल्या जात नाहीत. पगार स्लिप मागितली असता पगार स्लिप देण्यासाठी कागद उपलब्ध नाही, असे कार्यालयाकडून सांगितले जाते. दरम्यान, परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशन कोल्हापूर शाखेने महाविद्यालय प्रशासन व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व सहसंचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांना या बेमुदत काम बंद आंदोलनाबाबत महिन्यापूर्वी निवेदन पाठविले होते.
त्यानुसार सीपीआरमधील परिचारिका महाविद्यालयाच्या कार्यालयासमोर सोमवारी सकाळी एकत्र जमल्या. त्यानंतर कोल्हापूर शाखेच्या जिल्हाध्यक्षा हाश्मत हावेरी यांच्या नेतृत्वाखाली परिचारिकांनी प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुजी थोरात यांची भेट घेतली. यावेळी हावेरी यांनी सर्व परिचारिकांचा पगार एक तारखेला व्हावा, पगार नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. त्यामुळे प्रशासनाने महिन्याचा पगार एक तारखेलाच करावा, अशी मागणी केली. त्यावर थोरात यांनी, मनुष्यबळ कमी असल्याने पगाराला विलंब होत आहे. यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. दरम्यान, सीपीआरमधील नवजात अतिदक्षता बालक विभाग, प्रसूती विभाग, अपघात विभागामध्ये परिचारिका बसून होत्या. त्यामुळे शिकावू परिचारिका, डॉक्टर आरोग्यसेवेचे काम करत होते.
आंदोलनात ज्ञानेश्वर मुठे, संदीप नलवडे, मनोज चव्हाण, संजीवनी दळवी, सुजाता उरुणकर, श्रीमंती पाटील, स्वाती क्षीरसागर, प्रियंका पोवार, पुष्पा गायकवाड, शामल पुजारी यांच्यासह परिचारिकांचा सहभाग होता.
सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघाचा पाठिंबा
सीपीआरमधील परिचारिकांनी सुरू केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाला राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. अध्यक्ष वसंत डावरे, सरचिटणीस अनिल लवेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सीपीआरमध्ये सकाळी परिचारिकांना भेट दिली.
आरोग्य यंत्रणा कोलमडू नये, यासाठी २० ते २५ शिकाऊ डॉक्टर व परिचारिकांना नेमण्यात आले आहे. संघटनेच्या मागण्यांबाबत चर्चा सुरू आहे.
- डॉ. रघुजी थोरात, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर