‘सुपर न्यूमररी’ पद्धतीने जागा वाढविण्यास मुख्यमंत्री सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:50 AM2020-12-05T04:50:39+5:302020-12-05T04:50:39+5:30

कोल्हापूर : सुपर न्यूमररी (अधिसंख्य जागा) पद्धतीने जागा वाढवून वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ...

CM positive to increase space by 'super numerical' method | ‘सुपर न्यूमररी’ पद्धतीने जागा वाढविण्यास मुख्यमंत्री सकारात्मक

‘सुपर न्यूमररी’ पद्धतीने जागा वाढविण्यास मुख्यमंत्री सकारात्मक

Next

कोल्हापूर : सुपर न्यूमररी (अधिसंख्य जागा) पद्धतीने जागा वाढवून वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतले जाईल. त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी दिली.

मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक झाली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, मराठा समाजातील अभ्यासक राजेंद्र कोंढरे, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, ॲड. श्रीराम पिंगळे, प्रा. एम. एस. तांबे, आदी उपस्थित होते.

या बैठकीत सकल मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसह सुपर न्यूमररी पद्धतीने जागा वाढविणे आणि विविध पदांवरील नियुक्तींच्या विषयांवर चर्चा झाली. मराठा समाजातील अभ्यासकांनी ‘सुपर न्यूमररी’ जागा वाढविणे कसे योग्य आहे, ते मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले. या पद्धतीने जागा वाढविल्यास अन्य प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर सांगितले. त्यावर सुपर न्यूमररी पद्धतीने जागा वाढविण्यास मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उपस्थित सर्व मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. एसईबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन ‘सुपर न्यूमररी’बाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. गुरुवारी ते दिल्लीतील कायदेशीर सल्लागारांसमवेत चर्चा करणार आहेत. एमपीएससी., महावितरण, आदी विविध विभागांमधील समांतर आणि एसईबीसी आरक्षणातील विविध पदांच्या नियुक्त्यांबाबतही चर्चा झाली. त्याबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.

चौकट

‘लोकमत’ने मांडला मुद्दा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा प्रश्न ‘लोकमत’ने ‘एमबीबीएसच्या प्रवेशामध्ये मराठा तरुणांची कोंडी’ या वृत्ताद्वारे दि. २१ नोव्हेंबर रोजी मांडला होता.

Web Title: CM positive to increase space by 'super numerical' method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.