सुपर न्यूमररी पद्धतीने जागा वाढविण्यास मुख्यमंत्री सकारात्मक : संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 10:41 AM2020-12-03T10:41:41+5:302020-12-03T10:44:17+5:30
Maratha Reservation, Sambhaji Raje Chhatrapati, Uddhav Thackeray, kolhapur सुपर न्यूमररी (अधिसंख्य जागा) पद्धतीने जागा वाढवून वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतले जाईल. त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.
कोल्हापूर : सुपर न्यूमररी (अधिसंख्य जागा) पद्धतीने जागा वाढवून वैद्यकीय, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतले जाईल. त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.
मुंबईतील ह्यवर्षाह्ण निवासस्थानी बैठक झाली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, मराठा समाजातील अभ्यासक राजेंद्र कोंढरे, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, ॲड. श्रीराम पिंगळे, प्रा. एम. एस. तांबे, आदी उपस्थित होते.
या बैठकीत सकल मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसह सुपर न्यूमररी पद्धतीने जागा वाढविणे आणि विविध पदांवरील नियुक्तींच्या विषयांवर चर्चा झाली. मराठा समाजातील अभ्यासकांनी सुपर न्यूमररी जागा वाढविणे कसे योग्य आहे, ते मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले.
या पद्धतीने जागा वाढविल्यास अन्य प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यावर सुपर न्यूमररी पद्धतीने जागा वाढविण्यास मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह उपस्थित सर्व मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली.
एसईबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन ह्यसुपर न्यूमररीह्णबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. आज, गुरुवारी ते दिल्लीतील कायदेशीर सल्लागारांसमवेत चर्चा करणार आहेत. एमपीएससी., महावितरण, आदी विविध विभागांमधील समांतर आणि एसईबीसी आरक्षणातील विविध पदांच्या नियुक्त्यांबाबतही चर्चा झाली. त्याबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.
लोकमतने मांडला मुद्दा
मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा प्रश्न ह्यलोकमतह्णने ह्यएमबीबीएसच्या प्रवेशामध्ये मराठा तरुणांची कोंडीह्ण या वृत्ताद्वारे दि. २१ नोव्हेंबर रोजी मांडला. त्यानंतर याबाबतच्या अन्य वृत्तांच्या माध्यमातून लोकमत सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्याची दखल घेत खासदार संभाजीराजे यांनी दि. २४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठविले होते. या पत्रात मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मुंबईला येण्याचे निमंत्रण सरकारने खासदार संभाजीराजे यांना दूरध्वनीवरून दिले होते. त्यानुसार बुधवारी बैठक झाली.