CM Uddhav Thackeray : "यांनी वाढवत जायचे आणि आम्ही कमी करायचे का?"; पेट्रोल डिझेलवरून मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 05:32 PM2022-04-10T17:32:07+5:302022-04-10T17:32:53+5:30
CM Uddhav Thackeray : "आमच्या जीएसटीचीही रक्कम देत नाहीत. राज्याच्या विकासासाठी आम्ही ही आघाडी केली"- उद्धव ठाकरे
"देवेंद्र फडणवीस म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांना रेशन दिलं. रेशन दिलं, पण ते शिजवायचं की कच्चं खायचं. गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आदिवासी क्षेत्रात गेलं तर त्यांचंही तेच म्हणणं आहे, पहिलं सिलिंडर मिळालं, पण दुसरं भरताना कशी तारांबळ उडतेच ते कोण पाहायला आलं. पहिलं सिलिंडर दिलं आता काय कोरोना पळवायला रिकामं सिलिंडर वाजवायचा का?," असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. कोल्हापूरात जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेला मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केलं.
"रेशन दिलं ते जनतेच्या पैशातूनच दिलं, तुमच्या पैशातून नाही. विक्रांतच्या पैशातून तुमचं रेशन भरलं आणि दिलेलं रेशन शिजवायचं कसं हे सांगत नाही. कालच्या भाषणात महागाईबद्दल कोणी बोललं का. भाजपशासित राज्यात पेट्रोल डिझेलचे दर कमी केले या सरकारनं पण केले असते तर पेट्रोल स्वस्त मिळालं असतं असं म्हणाले. आम्ही कमी करायचे तुम्ही वाढवात जायचे. आमच्या जीएसटीचीही रक्कम देत नाहीत. राज्याच्या विकासासाठी आम्ही ही आघाडी केली," असंही ठाकरे म्हणाले.
"२०१४ ला युती आम्ही नव्हती तोडली"
"आज आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणतात, तुमचा भगवा खरा आमचा खोटा, पाठीमागे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आहेत, दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. २०१४ ला युती आम्ही नव्हती तोडली. शेवटचा दिवस असताना मला एकनाथ खडसेंचा फोन आला. आपलं काही जुळेल असं वाटत नाही, वेगवेगळं लढलेलं बरं असं ते म्हणाले. जागावाटप होत आलेलं पण अचानक असं काय घडलं? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. त्यावेळीही आमच्या हाती भगवा होता. तुम्ही युती तोडली आणि स्वतंत्र लढलो. शिवसेना ही समोरुन वार करतो, पाठून वार करत नसल्याचंही ते म्हणाले.
"देशात भाजपनंही बनावट हिदुहृदयसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न केला"
"देशात भाजपनंही बनावट हिदुहृदयसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फसला, लोकांनी तो झिडकारला. हिदुहृदयसम्राट म्हटल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि चेहरा समोर येतो. हिंदुहृदयसम्राट म्हणजे हिंदू अडचणीत असताना कसलीही पर्वा न करता मदतीला धावून येणारा तोच हिंदुहृदयसम्राट ठरू शकतो. त्यावेळी घरी बसून नंतर तुम्ही येणार आणि लोकांना प्रतिक्रिया देणार हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात. हिंदुहृदयासम्राटांबाबत इतकंच प्रेम आहे, तर मध्यंतरी त्यांच्या नावासमोर जनाब लावण्याचं कामही करण्यात आलं. त्यांच्या खोलीत अमित शाहंनी दिलेलं वचन का मोडलं याचं उत्तर का नाही देत. इतकंच प्रेम आहे तर नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायला विरोध का?," असा प्रश्नही त्यांनी केला.