"गोल बुबुळाच्या तीन नव्या पालींचा शोध, ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 12:17 PM2022-03-09T12:17:56+5:302022-03-09T12:22:30+5:30
या नव्या संशोधनामुळे भारतातील गोल बुबुळाच्या पालींची संख्या आता ७१ वर गेली आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : कर्नाटकातील तीन जिल्ह्यातून अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे आणि ईशान अगरवाल या संशोधकांनी पालीच्या तीन नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. हे तिघे ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे सदस्य आहेत. या तिन्ही प्रजाती या ''गोल बुबुळाच्या पाली'' या जातीमधील आहे. या नव्या संशोधनामुळे भारतातील गोल बुबुळाच्या पालींची संख्या आता ७१ वर गेली आहे.
भारतासह, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, सुमात्रा आणि त्याच्या जवळपासच्या बेटांवर या पाली आढळतात. जगभरात या जातीच्या शंभरापेक्षा जास्त प्रजाती आहेत, तर भारतात ६८ प्रजातींची नोंद आहे. शरीरशास्र आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर या पाली वेगळ्या असल्याचे सिद्ध झाले, तज्ञानी त्यासंबंधीची पुष्टी केल्यावर ७ मार्चला हा संशोधन निबंध व्हर्टब्रेट झुलॉजी या जर्मनीच्या संशोधनपत्रिकेतून प्रकाशित झाला.
या तीन पालींपैकी निमास्पिस टायग्रीस ही प्रजाती मैसुरेंसिस या गटातील असून ती कर्नाटकातील चिकबल्लापुर जिल्ह्यातील कैवारा येथे जून २०१९ मध्ये आढळली. या प्रजातीच्या नरांमध्ये वाघासारखे पट्टेदार रचना दिसते, म्हणून तिला ‘निमास्पिस’ म्हणतात. ही झुडपी प्रकारच्या जंगलात ग्रॅनाईटच्या खडकावर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आढळली.
दुसरी गोवाएनसीस गटातील असून ती हस्सन या जिल्ह्यातील सक्लेशपुर गावात जून २०१९ मध्ये आढळली, तिचे नामकरण गावावरून निमास्पिस सक्लेशपुरेनसिस असे केले. ही प्रजाती अर्ध सदाहरित जंगलात नदीच्या कडेने, झाडाच्या खोडांवर आणि घरांच्या भिंतीवर समुद्रसपाटीपासून ८५० मीटर उंचीवर आढळली.
तिसरी प्रजाती ही कोडागू जिल्ह्यात डिसेंबर २०२१ मध्ये आढळली, ही गोवाएनसीस गटातील असून, तिचे नामकरण ‘निमास्पिस विजयाई’ असे केले. या प्रजातीला दिलेले हे नाव पहिल्या भारतीय सरीसृप महिला संशोधिका कै. जे. विजया (१९५९–१९८७) यांनी कासवांवर केलेल्या संशोधन कार्याचा गौरव म्हणून दिले आहे. ही प्रजाती कॉफीच्या मळ्यांनी वेढलेल्या घरांच्या भिंतींवर समुद्रसपाटीपासून १२५० मीटर उंचीवर आढळली.
जनुकीय विश्लेषण
या तिन्ही प्रजाती मांडीवरील ग्रथींची व त्यामधील विनाग्रंथी खवल्यांची संख्या, शरीरावरील उंचवट्यांची तसेच खवल्यांची संख्या, रंग, इतर शारीरिक वैशिष्टे आणि जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर नवीन असल्याचे सिद्ध झाले.
भारतात अजूनही नवीन प्रजातींचा शोध लागत असल्याने पाली, सरपटणारे प्राणी आणि एकूणच पर्यावरणीय अभ्यासाच्या दृष्टीने फारसे काम झालेले नाही, हेच सिद्ध होत आहे. - तेजस ठाकरे, वन्यजीव संशोधक, ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशन.