सहकार परिषद मैलाचा दगड ठरेल
By admin | Published: January 18, 2016 12:10 AM2016-01-18T00:10:44+5:302016-01-18T00:32:44+5:30
काकासाहेब कोयटे : राज्यातील १६ हजार पतसंस्थांचे नेतृत्व राज्य पतसंस्था फेडरेशनकडे
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन राज्यातील १६ हजार पतसंस्थांचे नेतृत्व करीत आहे. सहकार परिषदेमध्ये पतसंस्थांच्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. परिषदेतील अहवाल मुख्यमंत्री, सहकारमंत्री, सचिव यांना सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे पतसंस्थेच्या कामात आजची सहकार परिषद मैलाचा दगड ठरणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील पतसंस्थांचे कामकाज १९९७च्या उपविधीआधारे सुरू आहे. मात्र, या सहकार परिषदेमध्ये पतसंस्थांमधील अडचणींविषयी चर्चा करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने एक लाखापर्यंतच्या ठेवीसाठी विमा संरक्षण दिले आहे. त्याप्रमाणे पतसंस्था ठेवींना विमा संरक्षण मिळावे, यासाठी फेडरेशनने परदेशी पतसंस्थांचा अभ्यास सुरू केला आहे. अहमदनगर जिल्हा पतसंस्थेतर्फे स्थैर्यनिधीसाठी लिक्वीडीटी बेस डिपॉझिट फंड विमा संरक्षणाचा शुभारंभ सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हिरवेबाजार येथे करण्यात येणार आहे.
त्यामुळे अहमदनगर पतसंस्था दीड लाखापर्यंतच्या ठेवीवर विमा संरक्षण देऊ शकते. पतसंस्थेच्या कामकाजात व्यावसायिकता, गतिमानता, आधुनिकता आणण्यासाठी फेडरेशन प्रयत्नशील आहे. व्यावसायिकतेमध्ये उत्पादने विक्रीबरोबर सर्वसामान्य ग्रामीण जनतेसाठी आॅनलाईन खरेदी तसेच सुवर्ण खरेदी योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कोयटे यांनी दिली. कामकाजात आधुनिकता व गतिमानता आणत असताना पेपरलेस, कॅशलेस बँकिंग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मोबाईल बँकिंग सुरू करुन पतसंस्था भक्कम करण्याचा प्रयत्न आहे.
आजपर्यंत पतसंस्थेबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र, आता पतसंस्थांची चांगली वाटचाल सुरू आहे. पतसंस्थांच्या नाहक चौकशा लावल्या जातात, त्यासाठी पतसंस्था सामोरे जाण्यास तयार आहे. मात्र, थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल करण्यासाठीही सहकार खात्याने आवाहन करावे, अशी मागणीही या परिषदेच्या अनुषंगाने करण्यात येणार असल्याचे काकासाहेब कोयटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)
रौप्य महोत्सव : निमंत्रितांची परिषद
रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी निमंत्रितांची सहकार परिषद आयोजित केली होती.