सहकारी संस्थांच्या निवडणूका पुन्हा लांबणीवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:51 AM2021-09-02T04:51:10+5:302021-09-02T04:51:10+5:30
कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य शासनाने वाढवलेली मुदत मंगळवारी संपली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता, संस्थांच्या ...
कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य शासनाने वाढवलेली मुदत मंगळवारी संपली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता, संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर जाणार असून, मुदत संपलेल्या संचालक मंडळांना डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२० पासून थांबलेल्या आहेत. निवडणुकीबाबत न्यायालयाने आदेश दिलेल्या संस्था वगळता सर्वच संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मे महिन्यात मुदत संपलेल्या संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्याची मुदत मंगळवारी संपली आहे. तत्पूर्वी राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इतर संस्थांच्या निवडणुकाही सुरू होतील, असे वाटत होते. मात्र, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संभाव्य तिसरी लाट येईल, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीची प्रक्रिया सुरू करणे अडचणीचे असल्याचे सरकारचे मत आहे. त्यामुळे डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वच संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याची शक्यता अधिक आहे. याबाबतचा अध्यादेश आज काढला जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील निम्म्या संस्था निवडणुकीस पात्र
जिल्ह्यात बारा हजार सहकारी संस्था आहेत. त्यातील निम्म्या संस्था निवडणुकीस पात्र आहेत. एका-एका संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत संपून दोन वर्षे झाल्याने त्यांच्या सभासदांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.