सहकार तत्त्वावरील धरण भोगतेय मरणयातना
By Admin | Published: January 3, 2017 12:23 AM2017-01-03T00:23:12+5:302017-01-03T00:23:12+5:30
पिलरचे दगड ढासळले : ६५ वर्षांपूर्वीचे धरण; ५० लाखांची गरज असताना २१ लाखांचा निधी
मच्छिंद्र मगदूम --सांगरूळ -१९५२ ला सांगरूळ व परिसरातील शेतकऱ्यांनी कुंभी नदीवर सहकारी तत्त्वावर कोल्हापूर पद्धतीचा पहिला बंधारा बांधला. बंधाऱ्याची आयुर्मर्यादा संपल्याने व पुराच्या पाण्याने दोन पिलरचे दगड ढासळल्याने ऐतिहासिक बंधारा धोक्यात आला आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ५० लाखांची गरज असताना २१ लाख देऊन बंधाऱ्याला अर्ध्या दुखण्यावर सोडले आहे.या धरणामुळे ११ गावांतून १५०० हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या संकल्पनेवर कुंभी धरण संस्थेने शेतकऱ्यांचा विकास केला आहे. मात्र, दुसरीकडे संस्थेला बंधारा दुरुस्तीला निधी उभा करता आला नाही. शेतकऱ्यांकडून बंधारा दुरुस्तीसाठी निधीची मागणी होत होती. शासनाने विशेष भाग म्हणून दोन टप्प्यांत २१ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. मात्र, इतक्या निधीत काम पूर्ण होत नसल्याने तो निधी अपुरा पडत आहे. दुरुस्तीसाठी ५० लाखांची गरज आहे. कुंभी धरण संस्थेला सांगरूळ बंधाऱ्यासह कोगे येथील खडक बंधाराही आहे. या बंधाऱ्याची दुरुस्ती व देखभाल धरण संस्था करते. मात्र, वसूल शासन करीत आहे. यामुळे बंधारे दुरुस्तीचा अधिकचा खर्च संस्थेवर पडत आहे.
दरम्यान, कोगे येथील बंधाऱ्यावर शासनाने दुरुस्ती खर्च दाखवून परस्पर खर्च केला व ही रक्कम संस्थेवर कर्ज म्हणून टाकली आहे. दरम्यान, शासनाने संस्थेला मदत करण्याऐवजी दुरुस्ती संस्थेने करायची व कर रूपातील मलई शासनाने खायची या प्रकाराबद्दल शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.