सहकारातील सत्तेसाठी संस्थांच्या जोडण्या
By admin | Published: November 2, 2014 11:40 PM2014-11-02T23:40:04+5:302014-11-02T23:54:04+5:30
निवडणुकीचे वेध : दोन हजार ६८९ सहकारी संस्था
कसबा बावडा : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या चर्चेचे गुऱ्हाळ पंधरा दिवस होऊनही अद्याप थांबलेले नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील दोन हजार ६८९ सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या चार-पाच महिन्यांत घेण्याच्या हालचाली सहकार खात्याने सुरू केल्याने पुन्हा एकदा निवडणुकांच्या चर्चेच्या गुऱ्हाळाला जोरात सुरुवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये जिल्हा बॅँक, गोकुळ संघ आणि बलाढ्य नेतेमंडळींच्या ताब्यात असणाऱ्या काही कारखान्यांचा समावेश आहे.
‘गोकुळ’ला काय होणार, जिल्हा बॅँक राष्ट्रवादीच्या ताब्यात राहणार काय? या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आमदारांची कशी आणि काय भूमिका राहणार? जिल्हा बॅँकेत संचालकपदाची संख्या घटल्याने कोणाचा पत्ता ‘कट’ होणार, या दोन्ही संस्थांत विविध पक्षांचे नेते सत्तेसाठी एकत्र येतील काय? साखर कारखाना पुन्हा सत्तारूढ गटाच्या ताब्यात राहणार काय? अशा प्रकारच्या या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
या चर्चेप्रमाणेच आपल्या गावातील विकास सेवा संस्था, पाणीपुरवठा संस्था, पतसंस्था, दूध संस्था यांच्या निवडणुकांबद्दलही चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणूक निकालाचा परिणाम आता स्थानिक राजकारणावर होणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीनेही गावपातळीवरील नेतेमंडळींही आता सावध भूमिका घेत आहेत.
ग्रामीण भागात सहकारी संस्थेवर चेअरमन, संचालक असणे हे राजकीयदृष्ट्या सोयीचे असते. त्यामुळे या संस्थांवरील सत्तेसाठी कार्यकर्ते धडपडत असतात. त्यामुळे ज्याला निवडणूक लढवावयाची आहे असे अनेक इच्छुक आता आपली कर्जे, थकबाकी भरत आहेत. तसेच कर्ज पूर्ण फेड केल्याचा दाखला घेत आहेत. आपण कोणत्या संस्थेत कोणाला जामीन तर नाही ना? याची माहितीही घेत आहेत.
सध्या ग्रामीण भागात सुगीचे दिवस सुरू आहेत; परंतु सायंकाळी घरी परतल्यानंतर गावच्या पारावर, दूध डेअरीच्या व विकास संस्थेच्या कार्यालयात निवडणुकीच्या खलबतांना सुरुवात झाली आहे. सहकार खात्याने निवडणुकीत पात्र ठरलेल्या तब्बल दोन हजार ६८९ संस्थांना निवडणुकीविषयी कळविले आहे. त्यामुळे सहकारी संस्थाही आता सावध झाल्या आहेत. आज ना उद्या केव्हाही निवडणुकीची तयारी करा, असा आदेश येऊ शकतो. त्यावेळी गडबड होऊ नये म्हणून पात्र संस्था त्या दृष्टीने कामाला लागल्या आहेत. एकूण २,६८० संस्थांच्या निवडणुका जरी येत्या काही महिन्यांत होणार असल्या तरी पहिल्या टप्प्यात ‘ड’ वर्गातील सुमारे ३७७ संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात ३७७ संस्थांच्या निवडणुका
सहकार खात्याकडून केव्हाही निवडणुकीची तयारी करा, असा आदेश येऊ शकतो. त्यावेळी गडबड होऊ नये म्हणून पात्र संस्था त्या दृष्टीने कामाला लागल्या आहेत. इच्छुक आपली कर्जे, थकबाकी भरत आहेत. तसेच कर्ज पूर्ण फेड केल्याचा दाखला घेत आहेत.
एकूण २,६८९ संस्थांच्या निवडणुका होणार
पहिल्या टप्प्यात ‘ड’ वर्गातील सुमारे ३७७ संस्थांच्या निवडणुका
सहकार खात्याने पात्र संस्थांना निवडणुकीसंदर्भात कळवले आहे.