कोयना जलविद्युतचे पाणी दुष्काळी भागात वळवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:49 AM2018-08-03T00:49:37+5:302018-08-03T00:49:43+5:30
विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोयना जलविद्युत प्रकल्प व टाटा जलविद्युत प्रकल्प समूहातून वीज निर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातून विपुलतेच्या खोºयात म्हणजेच कोकणात वळविण्यात येणारे पाणी टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा शासन गांभीर्याने विचार करत आहे. हे पाणी पूर्वेकडील कृष्णा आणि भीमा खोºयातील दुष्काळी भागाकडे वळविण्यात येणार आहे.
यासाठी उच्चस्तरीय अभ्यासगटाची जलसंपदा विभागाने गुरुवारी नियुक्ती केली. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अ. पां. भावे या अभ्यासगटाचे अध्यक्ष आहेत. या अभ्यासगटाने तीन महिन्यांत अहवाल द्यायचा आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाद्वारे ६७.५ अघफू व टाटा जलविद्युत प्रकल्पाद्वारे सरासरी ४२.५० अब्ज घनफूट (अघफू) कृष्णा खोºयातील अनुक्रमे ऊर्ध्व कृष्णा व ऊर्ध्व भीमा या उपखोºयातील पाणी विद्युत निर्मिती करून पश्चिमेकडे कोकणात वळविण्यात येते. कृष्णा पाणी तंटा लवादाने प्रति जलवर्षाकरिता खोºयाबाहेर पाणी वळविण्यासाठी सरासरी व महत्तम मर्यादा ठरवून दिली आहे. राज्य जलनीतीनुसार पिण्याचे पाणी व सिंचनाबाबत पाणी वापराचा प्राधान्यक्रम जलविद्युतच्या वर आहे. शिवाय अन्य विविध पर्यायांद्वारे वीज उपलब्ध करणे शक्य असल्याने कृष्णा खोºयातील पाण्याची वाढती मागणी विचारात घेता कोकणाकडे वळविलेल्या पाण्याबाबत फेरअभ्यास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
विशेषत : टाटा जलविद्युत प्रकल्पातून वळविण्यात येणारे पाणी भीमा या तुटीच्या खोºयातील असून या खोºयातील बहुतांशी भाग अवर्षणग्रस्त आहे. वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकीकरणामुळे, पिण्याच्या व औद्योगिक वापरासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी आहे. सिंचनासाठीही या प्रदेशात पाण्याची गरज आहे.
असा आहे अभ्यासगट
जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अ. पां. भावे हे या अभ्यासगटाचे अध्यक्ष असतील. सदस्यांमध्ये जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्रीकांत हुद्दार, निवृत्त सहसंचालक दि.मा.मोरे, जलविद्युत प्रकल्प व गुणनियंत्रण पुणेचे मुख्य अभियंता, पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, कोकण प्रदेशचे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांनी नियुक्त केलेला महाजनकोचा प्रतिनिधी, टाटा पॉवर कंपनीने नियुक्त केलेला प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या गटाचे सदस्य सचिव म्हणून पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता हे काम पाहतील.
अभ्यास गटाची कार्यकक्षा
१) टाटा जलविद्युत प्रकल्पासाठी गेल्या ९० वर्षापासून मुळशी व इतर धरणांतून भीमा उपखोºयातील दरवर्षी अंदाजे ४२.५० टीएमएसी पाणी पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी वळविण्यात येते.
२) ऊर्ध्व भीमा हे तुटीचे उपखोरे असून बहुतांश भाग दुष्काळग्रस्त आहे. टाटा प्रकल्पासाठी वीज निर्मितीसाठी वळविण्यात येणारे पाणी कमी करून पूर्वेकडे मूळ ऊर्ध्व भीमा उपखोºयातच वळविण्याकरिता वर्षनिहाय टप्पे ठरविण्यात येणार आहेत.
३) वीजनिर्मितीचे पाणी कमी करताना वीजनिर्मितीसाठी सध्याची निर्माण केलेली व्यवस्था जास्तीत जास्त कार्यक्षमतेने उपयोगात आणण्यासाठी काय बदल करावे लागतील याबाबत उपाययोजना सूचविणे
४) या जलविद्युत प्रकल्पातील पाणी कोकणांत सिंचन, पिण्यासाठी व औद्योगिकरणासाठी वापरले जाते. हे पाणी कमी केल्यावर त्या प्रदेशात अडचण होऊ नये यासाठी उपाययोजना सुचविणे.
५) या निर्णयामुळे काही कायदेशीर बाबी निर्माण होऊ शकतात का याविषयीचा अभ्यास करणे.