जलतरणात कोल्हापूरचा दबदबा

By Admin | Published: December 9, 2015 09:26 PM2015-12-09T21:26:07+5:302015-12-10T01:00:44+5:30

प्रशिक्षक श्रीकांत जांभळे यांच्याशी साधलेला थेट संवाद.

Coalition of Kolhapur in Swimming | जलतरणात कोल्हापूरचा दबदबा

जलतरणात कोल्हापूरचा दबदबा

googlenewsNext

जलतरण स्पर्धांमध्ये बंगलोर, चेन्नई, कोलकाता, आदी राज्यांचा दबदबा होता. मात्र, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रही त्यात अग्रेसर होऊ लागला आहे. स्पर्धा आशियाई, राष्ट्रकुल, राष्ट्रीय आणि आॅलिम्पिक असो, त्यात महाराष्ट्र त्यामध्ये कोल्हापूरचे जलतरणपटू राज्य, देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. ही किमया केवळ जलतरणपटूंच्या कसून सरावाची नसते, तर त्यांच्याकडून करवून घेणाऱ्या प्रशिक्षकांचीही असते. वीरधवल खाडे, मंदार दिवसे, अवनी सावंत, पूजा नायर, कपिल नालंग, सोनाली पाटील, श्रेणीक जांभळे, आदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू, तेही कोल्हापुरातून घडविणारे प्रशिक्षक श्रीकांत जांभळे यांच्याशी साधलेला थेट संवाद.


प्रश्न : आपण जलतरण प्रशिक्षणाकडे कसे वळलात?
उत्तर : १९७५ मध्ये मी शाहू कॉलेज, कदमवाडी येथे पदवीचे शिक्षण घेत असताना गोखले कॉलेजसमोरील सर पिराजीराव घाटगे ट्रस्टच्या भवानी जलतरण तलावामध्ये पोहायला येत होतो. येथे वडील रघुनाथराव यांनी प्रथम मला पोहायला शिकविले. माझी प्रथम शिवाजी विद्यापीठाकडून झोनल, इंटर झोनल स्पर्धेसाठी निवड झाली. यादरम्यान माझे पदवीचेही शिक्षण पूर्ण झाले. वडील राजाराम कॉलेजमध्ये कार्यरत होते. त्यांची आणि क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर यांची ओळख होती. नागेशकर सरांनी तू चांगला पोहतोस मग आमच्या ‘पीजीटी’च्या भवानी तलावामध्ये प्रशिक्षक म्हणून काम कर, असे सांगितले. पुढे प्रशिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच मला नागेशकर सरांनी पुण्यातील हडपसर येथे आर्मी पीटी स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविले. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण सिव्हीलियन अर्थात सर्वसामान्य नागरिकांना मिळत नव्हते, तरीही नागेशकर सरांमुळे मला त्या स्कूलमध्ये प्रवेश मिळाला. त्यामध्ये मला शास्त्रोक्त जलतरण आणि लाईफ सेव्हिंगचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण मिळाले.
प्रश्न : जलतरण स्पर्धांकरिता मुलांचा शोध कसा सुरू केला?
उत्तर : त्यानंतर १९९१ मध्ये ट्रस्टमध्ये मुख्य प्रवीणसिंहराजे घाटगे यांनी लक्ष घातल्यानंतर मला पुन्हा बंगलोर येथील बसवणगुडी येथे अ‍ॅडव्हान्स ट्रेनिंगसाठी पाठविले. तेथे मला स्ट्रोक म्हणजे काय हे शिकविले. येथे पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठातील प्राचार्य, तज्ज्ञ हे प्रशिक्षण देत होते. तेथून आल्यानंतर मग मी ट्रस्टमध्ये पोहायला शिकायला येणाऱ्या जलतरणपटूंना स्पर्धेत भाग घेऊन यश कसे मिळवायचे, हे शिकवू लागलो. उन्हाळ्याच्या सुटीत आपल्या पाल्यांना काही पालक पोहायला शिकविण्यासाठी आमच्या ट्रस्टच्या भवानी जलतरण तलावात घालत असत. त्यातून ते पोहायला शिकले की, मी त्या मुलांमधील टॅलेंट शोधत आणि त्यांना व त्यांच्या पालकांना स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी उद्युक्त करत असे. त्यातून भोगावती नदीमध्ये पोहणारे एम. आर. चरापले, सुरेश पाटील, संतोष बर्गे, आक्काताई कांबळे, आदी आले. त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात पदके प्राप्त केली. त्यातील आक्काताई तर पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत. ‘पीजीटी’चा एक मंत्र आहे. त्यानुसार ‘लर्न टू स्वीम’ अर्थात पोहण्यासाठी शिकविणे हे प्रथम, त्यानंतर आम्ही त्या मुलांची स्पर्धेकरिता तयारी करून घेतो.
प्रश्न : जलतरण स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी जलतरणपटूंना काय गरजेचे आहे?
उत्तर : मुलांना प्रथम शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजेच बटरफ्लाय, बॅक स्ट्रोक, बेस्ट स्ट्रोक, आदी प्रकारांत पारंगत व्हावे लागते. त्यात ५०, १००, मीटरमध्ये कसब दाखवावे लागते. त्यात महत्त्वाचे म्हणजे पालक, मुलगा आणि प्रशिक्षकांची गट्टी जमली तरच उत्तम जलतरणपटू घडतो. त्यासाठी प्रथम बेसिक प्रोग्रॅम होतो. त्यानंतर अ‍ॅडव्हान्स ट्रेनिंग व स्पर्धात्मक दर्जाचे ट्रेनिंग दिले जाते. सर्वसाधारणपणे जलतरणपटूंना १० ते २५ वयापर्यंतच आपले करिअर यात घडवावे लागते. वय वाढल्यानंतर सेकंदांचा फरक स्पर्धेत पडत जातो. त्यामुळे स्पर्धांमध्ये अपेक्षित कामगिरी करता येत नाही. याकरिता सराव आवश्यक असतो.
प्रश्न : तुम्ही घडविलेले खेळाडू कोणते?
उत्तर : माझी पहिली प्रशिक्षणार्थी अंजली मुटकेकर हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत प्रथम आपल्या कोल्हापूरसाठी पदक जिंकले. त्यानंतर पुढे आनंदा बर्गे, राजेंद्र मोरे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू पूजा नायर, मधुरिका घाटगे, अवनी सावंत, श्रेणिक जांभळे, मंदार दिवसे, पूजा कब्बूर, सई गुळवणी, गौरांग देशपांडे, सायली अतिग्रे, करण धर्माधिकारी यांना प्रशिक्षित केले. त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांत कोल्हापूरचा झेंडा अटकेपार नेला. त्यानंतरच्या काळात वीरधवल खाडे हा माझ्याकडे उन्हाळ्याच्या सुटीत आला होता. त्याची उंची व पोहण्याची गती पाहून वडील विक्रांत यांनी त्याला शास्त्रोक्त पद्धतीने पोहण्यासाठी तयार करण्यासाठी सांगितले. त्यानुसार त्याच्याबरोबर अजिंक्य आपटे, सोनाली पाटील, कपिल नालंग, श्रद्धा चव्हाण ही मुले तयार झाली.
प्रश्न : जलतरणपटूंना आहाराचे ज्ञान कसे दिले जाते?
उत्तर : जलतरणपटूंना आहार हा डायटिशियनना बोलावून सांगितला जातो. विशेषत: पोहण्यासाठी त्या मुलांमध्ये ऊर्जा निर्माण व्हावी, असा आहार त्यांना सुचविला जातो.
प्रश्न : सर्वांत स्वस्त जलतरण प्रशिक्षण कुठे मिळते?
उत्तर : कोल्हापुरातील सर पिराजीराव घाटगे ट्रस्टच्या भवानी जलतरण तलाव येथे केवळ वार्षिक सात हजार रुपयांमध्ये मुलांना वर्षभर स्पर्धात्मक तयारी व बेसिक, अ‍ॅडव्हान्स जलतरण प्रशिक्षण दिले जाते. माझ्यामते कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्वाधिक स्वस्तातील प्रशिक्षण आहे. त्यामध्ये भोगावती येथील मुलांना तर मोफत प्रशिक्षण दिले जाते.
- सचिन भोसले

Web Title: Coalition of Kolhapur in Swimming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.