कोल्हापुरात कोकेनचा पुरवठा करणाऱ्यास मुंबईतून अटक, मूळचा पाचगावचा; मोठी साखळी कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 04:47 PM2024-10-14T16:47:38+5:302024-10-14T16:51:52+5:30
शेअर ट्रेडिंग करणाऱ्याकडून कोकेनची तस्करी
कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नागाळा पार्क येथे सापळा रचून पकडलेला कोकेन विक्रेता नीलेश राजेंद्र जाधव (वय ४०, रा. बुधवार पेठ, कोल्हापूर) याने मुंबईतून कोकेन आणल्याचे तपासात स्पष्ट झाले. कोकेनचा पुरवठादार विशाल विलास तांबडे (वय ५०, सध्या रा. मुंबई, मूळ रा. पाचगाव, ता. करवीर) याला पोलिसांनी रविवारी (दि. १३) मुंबईतून अटक केली. या तस्करीतील मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
पोलिसांनी गुरुवारी (दि. १०) नागाळा पार्क येथून नीलेश जाधव याला अटक करून त्याच्याकडील १३३ ग्रॅम कोकेन अमली पदार्थ जप्त केले होते. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. अधिक चौकशी केली असता, त्याने मुंबईतून कोकेन आणल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने मुंबईत ग्रँट रोड येथे जाऊन कोकेन पुरवठादार विलास तांबडे याला अटक केली. तो मूळचा पाचगाव येथील रायगड कॉलनीत राहणारा आहे.
शेअर मार्केट ट्रेडिंगचा व्यवसाय करणारा तांबडे हा गेल्या काही वर्षांपासून मुंबईत राहतो. न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत (दि. १४) पोलिस कोठडी मिळाली. तांबडे याने कोकेन कोणाकडून आणले, याचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.
अमली पदार्थांचा लाखोंचा बाजार
गांजा आणि चरस विकणाऱ्यांना पोलिसांना अनेकदा अटक करून त्यांच्याकडील लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, अलीकडच्या काळात कोकेन विक्रेत्याला पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावरून कोकेनची विक्री कोल्हापुरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडील १३३ ग्रॅम कोकेनची किंमत २० लाख रुपये आहे.