दिवाळीच्या तोंडावर खोबरे महागले: टोमॅटो, केळीचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:11 AM2019-10-14T11:11:32+5:302019-10-14T11:13:09+5:30
दिवाळीच्या तोंडावर सुके खोबरे महागले असून, ते २०० रुपये किलो झाले आहे; तर आवक घटल्याने टोमॅटो व केळीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे चित्र आहे. ३० रुपये किलो दराच्या टोमॅटोचा दर बाजारात ५० रुपयांवर पोहोचला आहे; तर केळीचा दर ३० रुपयांवरून ८० रुपये डझनवर गेला आहे. सीताफळांचीही आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, त्यांचा दर ८० रुपये किलो आहे.
कोल्हापूर : दिवाळीच्या तोंडावर सुके खोबरे महागले असून, ते २०० रुपये किलो झाले आहे; तर आवक घटल्याने टोमॅटो व केळीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे चित्र आहे. ३० रुपये किलो दराच्या टोमॅटोचा दर बाजारात ५० रुपयांवर पोहोचला आहे; तर केळीचा दर ३० रुपयांवरून ८० रुपये डझनवर गेला आहे. सीताफळांचीही आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, त्यांचा दर ८० रुपये किलो आहे.
तोंडावरच येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीची लगबग बाजारामध्ये दिसत आहे. असे असले तरी या खरेदीला अजून जोर नसल्याचे दिसत आहे. दिवाळीच्या फराळामध्ये महत्त्वाचा घटक असलेले सुके खोबरे महागले आहे. टोमॅटोची व केळांची आवक घटल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे.
बाजारात सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, त्याचा दर ८० रुपये किलो आहे. त्याचबरोबर सफरचंदांचा दर ७० ते १०० रुपये किलो व पेरू १०० रुपये किलोवर पोहोचला आहे. धान्य व कडधान्यांमध्येही गत आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. यात मूग ७२ रुपये प्रतिकिलोवरून ८० रुपयांवर, मटकी ११० रुपये किलोवरून १२० रुपयांवर, पांढरे वांगे ७० रुपयांवर ८० रुपये किलोवर गेले आहे. तसेच पेरणीच्या धनेच्या दरात दुप्पट वाढ झाली असून ५० रुपये किलोवरून ते १०० रुपयांवर गेले आहे.
मक्याचा दर मात्र गत आठवड्याच्या तुलनेत कमी झाला असून, तो प्रतिकिलो २६ रुपयांवर १७ रुपयांपर्यंत खाली आला आहे. गव्हाच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली असून तो ३७ रुपये किलो दरावर पोहोचला आहे. ज्वारी ३२ रुपयांवरून ३७ रुपये प्रतिकिलो दरावर पोहोचली आहे.
काकडीचा दर ३० रुपये किलो, दोडका ४० रुपये, हिरवा वाटाणा १०० रुपये, गवार ८० रुपये, ओल्या भुईमुगाच्या शेंगा ६० रुपये, हिरव्या मिरच्या ४० रुपये, भेंडी ४० रुपये, शेपू १० रुपये पेंढी, मेथी १५ रुपये पेंढी असा दर राहिला आहे.
कांदा ३५ रुपये किलो
कांद्याचा दर ३० रुपयांवरून ३५ रुपये किलो झाला आहे. बटाट्याचा दर २५ रुपये किलोवर पोहोचला आहे. लसणाचा दर १६० रुपये किलो असा झाला आहे.