नारळ फुटला, एक अर्ज दाखल
By admin | Published: October 8, 2015 01:18 AM2015-10-08T01:18:40+5:302015-10-08T01:18:53+5:30
प्रकाश नाईकनवरेंचे शक्तिप्रदर्शन : दुसऱ्या दिवशीही केवळ प्रतीक्षाच
कोल्हापूर : पुरोगामी विचारांची कास धरणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर या विचारांचा आदर्श ठेवणारे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या कोल्हापूर शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही इच्छुक उमेदवारांनी पाठ फिरविली. पितृपंधरवडा असल्याने बुधवारीही उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज भरण्याचे टाळले. मात्र, असल्या शुभ-अशुभांच्या भ्रामक कल्पनांना छेद देत नगरसेवक प्रकाश रामचंद्र नाईकनवरे यांनी बुधवारी व्हीनस कॉर्नर प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
गेल्या काही महिन्यांपासून राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांना महानगरपालिका निवडणुकीची प्रतीक्षा लागून होती. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरू होऊन दोन दिवस झाले तरी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्याचा मोह टाळला आहे. सध्या पितृपंधरवडा सुरू असल्याने कथित अशुभ काळात उमेदवारी अर्ज भरायला नकोत, अशीच भूमिका उमेदवारांनी घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोणत्याही पुरोगामी बदलाच्या प्रक्रियेत पुढाकार घेणाऱ्या शहरातील कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास उदासीनता दाखवावी, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे डावे, पुरोगामी विचारांच्या काही पक्षीय कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे टाळले आहे. दोन दिवस अक्षरश: निवडणूक कार्यालये ओस पडली आहेत. (पान १ वरून) दरम्यान, बुधवारी या शुभ-अशुभाच्या भ्रामक कल्पनेस छेद देत नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांनी व्हीनस कॉर्नर प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप-ताराराणी आघाडी महायुतीतर्फे नाईकनवरे निवडणूक लढविणार असून, त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी त्यांच्या प्रभागातून रॅली काढून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. नाईकनवरे यांची सून पूजा स्वप्निल नाईकनवरे यांनीही शक्तिप्रदर्शन केले. परंतु, त्यांनी निवडणूक कार्यालयात जाऊन फक्त माहिती घेतली.
कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-ताराराणी महायुती, शिवसेना यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. त्यांच्या कार्यालयांत उमेदवारांनी आवश्यक ती माहिती दिल्यावर आॅनलाईन फॉर्म भरले जात आहेत. त्याची स्थळप्रत काढून उमेदवारांना दिली जात आहे. आॅनलाईन अर्ज भरला की जबाबदारी संपत नाही. आॅनलाईन अर्ज भरून त्याची स्थळप्रत उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सादर केल्यानंतरच त्यांचा अर्ज दाखल झाल्याचे ग्राह्ण धरले जाणार आहे. अर्ज सादर केल्यावर निवडणूक निर्णय अधिकारीच तो अर्ज आॅनलाईन सबमीट करणार आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया आॅनलाईन सुरू झाली आहे. परंतु, ते निवडणूक कार्यालयात मात्र दाखल केले जात नाहीत. ते मुहूर्तानेच दाखल करण्याची अनेकांची इच्छा आहे.
एकाच वेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेबसाईटचा वापर झाला तर सर्व्हर डाऊन होऊ शकतो. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मंगळवारी पहिल्या दिवशी दुपारी दीड वाजेपर्यंत सर्व्हर डाऊन होता. वेबसाईटवर अर्जाचे नमुने खुले होत नव्हते. त्यामुळे शेवटच्या दिवशीही अशी घटना घडू शकते. याबाबत आयुक्त पी. शिवशंकर यांना विचारले असता त्यांनी, ‘काहीही घडू शकते. म्हणूनच उमेदवारांना अर्ज भरण्यास सहा दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. सर्व्हर डाऊन झालाच तर काय? या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याजवळ नाही’, असे उत्तर दिले.
...तर अडचणी येऊ शकतात
पितृपंधरवडा असल्याचे कारण देत उमेदवारी अर्ज भरण्याचे टाळले जात असले तरी शुभ मुहूर्तावर अर्ज भरायचा झाल्यास फक्त मंगळवारी (दि. १३) घटस्थापनेचा एकच दिवस उमेदवारांना मिळणार आहे. या दिवशी सर्व कार्यालयांतून उमेदवारांची गर्दी झाली तर कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते. एकाच वेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेबसाईटचा वापर झाला तर सर्व्हर डाऊन होऊ शकतो.