नारळ फुटले; प्रचाराला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:30 AM2017-10-09T00:30:04+5:302017-10-09T00:30:04+5:30
संदीप बावचे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : अर्ज माघारीनंतर शिरोळ तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गावांतील वातावरण तापू लागले आहे. नशीब आजमावण्यासाठी तसेच सरपंच, सदस्यपद मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या प्रचाराचा नारळ फुटला असून, भेटीगाठींना वेग आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी फटाके फोडण्यासाठी उमेदवार सज्ज झाले आहेत.
तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर चिंचवाड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. सर्वच गट-तट व पक्ष एकत्र आल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. १४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाकरिता ४९, तर सदस्य पदाकरिता ३९५ उमेदवार निवडणूक रिंंगणात आहेत. सुरुवातीला पक्षीय पातळीवर निवडणूक लढणार म्हणणाºया नेत्यांनी आपली तलवार म्यान करून आघाड्यांना महत्त्व दिले आहे. कार्यकर्त्यांच्या हट्टापोटी नेत्यांनी सोयीच्या आघाड्या केल्या आहेत.
दरम्यान, अर्ज मागे घेतल्यामुळे खरे उमेदवार स्पष्ट झाले आहेत. अनेक गावात सध्या प्रचाराचा नारळ फुटल्याने प्रचाराला वेग येत आहे. प्रचारासाठी सकाळी दुचाकी रॅली काढली जाते. हालगीचा वापर प्रचारासाठी केला जात आहे. यामुळे वाजविणाºयांनाही सुगीचे दिवस आले आहेत. ज्या उमेदवारांच्या सौभाग्यवती सरपंच, ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचे पतिराज दारोदारी, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. रात्रीच्या वेळी कॉर्नर बैठका घेतल्या जात आहेत. यामध्ये विकासाच्या आश्वासनाचा पाऊस पॅनेलप्रमुखांकडून पाडला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. नेतेमंडळी मताची वजाबाकी व स्थानिक समीकरणांना महत्त्व देत आहेत.
सरपंचपदाला महत्त्व
ंंलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिरोळ तालुक्यात भाजपला तीन, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व स्वाभिमानीला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. १४ ग्रामपंचायतींपैकी शिवनाकवाडी, हरोली, टाकवडे, कवठेसार, उमळवाड, कनवाड, अकिवाट व नवे दानवाड याठिकाणी भाजपचा उमेदवार सरपंचपदाची निवडणूक लढवित आहे. थेट सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने ग्रामपंचायतीत सरपंचांना महत्त्व आले आहे.
नेत्यांचे संभाजीपूर टार्गेट
संभाजीपूर ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार आहे. काँग्रेस-स्वाभिमानी-ज्येष्ठ नागरिक आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे. भाजपनेही उमेदवार दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जयसिंगपूर शहराजवळ असलेल्या संभाजीपूर ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी नेत्यांनी ही निवडणूक टार्गेट केली आहे. यामुळे खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अनिल यादव या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.