महापौरांविरोधात संघर्षाचा ‘नारळ’ फुटला
By admin | Published: February 19, 2015 12:14 AM2015-02-19T00:14:06+5:302015-02-19T00:22:53+5:30
आरोग्य शिबिराचे दोन वेळा उद्घाटन : महापौर येताच नगरसेवकांचा कार्यक्रमावर बहिष्कार टाकून काढता पाय
कोल्हापूर : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत मोरे-मानेनगर येथे बुधवारी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन समारंभात महापौर राजीनाम्याचे पडसाद उमटले. उपमहापौर मोहन गोंजारे यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर तृप्ती माळवी येण्यापूर्वीच उद्घाटनाचे सोपस्कार पूर्ण केले. यानंतर महापौर शिबिराच्या ठिकाणी येताच नगरसेवकांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाक त काढता पाय घेतला. प्रशासनाने ठरल्याप्रमाणे पुन्हा महापौरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन उरकले. ही घटना येत्या काळात ‘महापौर विरुद्ध नगरसेवक’ यांच्यातील शीतयुद्धाची नांदी च असल्याचे बोलले जात आहे.
महापौरपदाची मुदत संपल्यानंतरही नेत्यांचे आदेश डावलत महापौर तृप्ती माळवी यांनी पायउतार होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चिडलेल्या राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांविरुद्ध ‘एल्गार’ पुकारला आहे. आज आरोग्य शिबिराच्या उद्घाटनावरून महापौर व नगरसेवक यांच्यातील शीतयुद्धाचा प्रत्यक्ष ‘नारळ’ फुटला. येत्या काळात दोन्हीकडील दरी अधिक रुंदावत जोरदार संघर्ष होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आरोग्य विभागाने राजशिष्टाचाराप्रमाणे महापौरांच्या हस्ते शिबिराच्या उद्घाटनासाठीच्या निमंत्रण पत्रिका छापल्या. पत्रिकेत रीतसर सर्व पदाधिकारी व स्थानिक नगरसेवकांचाही उल्लेख केला. सकाळी दहाच्या सुमारास उद्घाटनाची वेळ निश्चित करण्यात आली. मात्र, ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास अगोदर गटनेता शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, चंद्रकांत घाटगे, महेश गायकवाड, इंद्रजित बोंद्रे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लीला धुमाळ कार्यक्रमस्थळी आले. उपमहापौर मोहन गोंजारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली.
दरम्यान, महापौर तृप्ती माळवी कार्यक्रमस्थळी आल्या. महापौर येताच सर्व पदाधिकारी शिबिराच्या ठिकाणाहून महापौरांशी न बोलताच निघून गेले. यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत महापौरांनी फीत कापून शिबिराचे दुसऱ्यांदा उद्घाटन केले. घडल्या प्रकाराची जोरदार चर्चा घटनास्थळी व महापालिकेत सुरू आहे. (प्रतिनिधी)
प्रशासनाच्या अडचणी वाढणार
सत्ताधारी नगरसेवकांनी महासभेला अनुपस्थित राहून बहिष्कार टाकण्याची घोषणा नुकतीच केली आहे. आजचे उद्घाटन ही महापौर व नगरसेवक यांच्यातील शीतयुद्धाची सुरुवात आहे. आर्थिक नियोजनासाठीची महासभा
२० मार्चपर्यंत घेणे गरजेचे आहे. महापौर-नगरसेवक यांच्यात वाद वाढत जाऊन ही सभाच न झाल्यास प्रशासनापुढील अडचणी वाढणार आहेत.
नेते हतबल
महापौर तृप्ती माळवी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. महापालिकेच्या राजकीय व सामाजिक उपक्रमांतूनही त्या आता सक्रीय झाल्या आहेत. महापौरांच्या राजीनाम्याबाबत आवाहन करण्यापलीकडे नेत्यांच्या ‘हाता’त काहीच राहिलेले नाही. पडद्यामागे महासभेच्या कोरमची जोडणी सुरू आहे. अपक्ष नगरसेवक उघडपणे सभेला उपस्थित राहणार असल्याचे सांगत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महापौरांविरोधात पुकारलेल्या अहंकाराचे युद्ध भविष्यात रस्त्यावर अवतरण्याची शक्यता आहे.
महापालिकेत उत्सुकता
महापौर व नगरसेवक यांच्यातील शीतयुद्धाची सुरुवात नेमकी कधी व कशी होणार याबाबत महापालिका वर्तुळात उत्सुकता होती. ही कोंडी आजच्या उद्घाटनामुळे फुटली.