ग्रामपंचायतीची आचारसंहिता त्या गावापुरतीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:39 AM2020-12-12T04:39:03+5:302020-12-12T04:39:03+5:30
कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता गावापुरतीच असल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी निम्म्याहून ...
कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता गावापुरतीच असल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक लागली तर मात्र जिल्ह्याला आचारसंहिता लागते. त्यामुळे या निवडणुकीची आचारसंहिता त्या त्या गावाच्या क्षेत्रापुरती राहणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी हे स्पष्ट केले आहे. ही आचारसंहिता मंगळवारपासून लागू होत आहे.
दुपारनंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सदस्यांच्या पोटात गोळा आला. कारण एकीकडे पंधराव्या वित्त आयोगाचा विषय मार्गी लागला आहे. निधी वाटप झाले आहे. कामांच्या प्रशासकीय मंजुऱ्याही झाल्या आहेत. याच वित्त आयोगाचा थेट निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा आहे; परंतु अजून अनेक ठिकाणी कामांना सुरुवात झालेली नाही. आत्ताच पदवीधर, ‘शिक्षक’च्या निवडणुकीची आचारसंहिता चारच दिवसांपूर्वी संपली आहे. त्यामुळे या आचारसंहितेविषयी अनेकांना उत्सुकता होती.
निवडणूक आयोगाच्या परिपत्रकामध्येच ही आचारसंहिता त्या त्या गावापुरती लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जर जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींच्या निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक लागली तर मात्र संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता लागते. ही आचारसंहिता गावापुरतीच असल्याने अन्य गावांतील विकासकामे, पंचायत समित्या, जिल्हा परिषदेच्या सर्व प्रशासकीय बाबी नियमित सुरू राहणार आहेत.
चौकट
सदस्यांचे लक्ष गावांकडे
जिल्हा परिषदेच्या अनेक सदस्यांच्या गावच्या आणि मतदारसंघांतीलही निवडणुका लागल्यामुळे आता सर्वांनाच या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे आता १५ डिसेंबरपासून या सर्वांचे जिल्हा परिषदेकडे येणे कमी होणार आहे. १५ डिसेंबर २० ते १८ जानेवारी २० पर्यंत बहुतांशी सदस्य याच कामात गुंतणार आहेत.