आचारसंहितेपूर्वी नाट्यगृहाची तिसरी घंटा?
By admin | Published: September 13, 2015 12:03 AM2015-09-13T00:03:51+5:302015-09-13T00:03:51+5:30
लोकप्रतिनिधींकडून घाई : केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात
इंदूमती गणेश / कोल्हापूर
नूतनीकरणाच्या कारणात्सव गेले दीड वर्ष बंद असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची तिसरी घंटा महापालिका निवडणुकीच्या आधी वाजणार आहे. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात नाट्यगृहाचे काम झाले आहे, त्याच सभागृहातील नेत्यांच्या उपस्थितीत नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा सोहळा व्हावा यासाठी महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांकडे विचारणा सुरू केली आहे.
शासनाने देऊ केलेल्या १० कोटींच्या निधीत केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाचे महापालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात आले आहे. खासबाग मैदानाचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे; तर नाट्यगृहाच्या कामावर अखेरचा हात फिरविणे, परिसराची स्वच्छता अशी कामे सुरू आहेत. वातानुकूलन, प्रकाश व ध्वनियंत्रणा बसविण्यात आली असून, तिची चाचणी होणे बाकी आहे. अशा रीतीने नाट्यगृहाचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहाचे उद्घाटन करण्याचे वेध सगळ्यांना लागले आहेत. खरे तर केशवराव भोसले यांची १२५ वी जयंती आणि १५ आॅगस्ट या दोन तारखांना उद्घाटन करण्याचा मुहूर्त टळला आहे. आता शहरात सगळीकडे महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. काही दिवसांतच गणेशोत्सव सुरू होत आहे. तो संपल्यानंतर आचासंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी विचारणा सुरू केली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणात लक्ष घातले होते. माजी मंत्री सतेज पाटील यांनीही त्यात लक्ष घातले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात चित्रनगरी आणि अंबाबाई मंदिराचा विकास रखडला असला तरी नाट्यगृहाचा विषय मार्गी लागला आहे. आता महापालिकेतील त्यांची सत्ता अबाधित राहणार की सत्तांतर होणार, हे ठरायला दोन महिने बाकी असले तरी आपल्या पक्षाने केलेले काम जनतेसमोर यावे, अशी इच्छा दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचीही इच्छा आहे आणि नगरसेवकांना निवडणूक काळातही प्रचारासाठी त्याचा फायदा होणार आहे.