कोगनोळी तपासणी नाका असून अडचण नसून खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 02:42 PM2021-04-26T14:42:52+5:302021-04-26T14:46:08+5:30
CoronaVirus KarnatakaBorder - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारनेही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील कोरोना तपासणी पथक असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
बाबासो हळिज्वाळे
कोगनोळी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारनेही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील कोरोना तपासणी पथक असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याची शक्यता लक्षात येताच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच कर्नाटक शासनाने महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सिमा असणाऱ्या कोगनोळी येथे पुन्हा एकदा तपासणी नाके सुरू केली. कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्वच वाहनांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले.
महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील तपासणी पथकाद्वारे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवासी वाहनांची तपासणी केली जाते. वाहनातील प्रवाशांकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल तर त्यांना कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जात नाही. यामध्ये मालवाहतूक करणारी वाहने, स्थानिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, दुचाकीस्वार यांना सवलत देण्यात आलेली आहे.
कर्नाटक राज्याव्यतिरिक्त इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांनाही कर्नाटकात कुठेही न थांबण्याच्या अटीवर पुढील प्रवासास मान्यता दिली जाते. या तपासणी पथकामध्ये पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व आशा कार्यकर्त्या यांच्याकडून कामकाज पाहिले जाते. हे कर्नाटकात प्रवेश करण्याचे मुख्य ठिकाण असल्याने या पथकास वारंवार अधिकाऱ्यांच्या भेटी होत असतात. बेळगावचे जिल्हाधिकारी हरीश कुमार, कोविड नियंत्रण विशेष पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलिस महासंचालक भास्करराव यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेऊन येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनही दिले आहे.
शेजारच्या महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग गावी परतण्याच्या तयारीत असू शकतो. त्यामुळे या तपासणी पथकामध्ये अतिरिक्त 25 स्थानिक होमगार्डची नियुक्ती करण्यात येणार आहे.
-संतोष सत्यनाईक,
मंडल पोलीस निरीक्षक