चिमुकल्याच्या अन्ननलिकेतील नाणे, फुप्फुसातील खोबऱ्याचा तुकडा काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:24 AM2021-04-09T04:24:04+5:302021-04-09T04:24:04+5:30
कोल्हापूर : एका बाळाच्या अन्ननलिकेत अडकलेले नाणे आणि दुसऱ्या चिमुकल्याच्या फुप्फुसामध्ये अडकलेला खोबऱ्याचा तुकडा ...
कोल्हापूर : एका बाळाच्या अन्ननलिकेत अडकलेले नाणे आणि दुसऱ्या चिमुकल्याच्या फुप्फुसामध्ये अडकलेला खोबऱ्याचा तुकडा काढण्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे. कान, नाक, घसाशास्त्र विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही कामगिरी करून दाखविली आहे.
कागल येथील दोन वर्षांच्या मुलीला श्वास घेताना त्रास होत असल्याने ३० एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता सीपीआरमध्ये आणण्यात आले. खोबऱ्याचा तुकडा खाताना मुलीला ठसका लागल्याचे पालकांनी सांगितले. श्वास घेण्यास तिला त्रास होत असल्याने ऑक्सिजन पातळी कमी होऊ लागली. तातडीने एक्सरे काढण्यात आला. फुप्फुसे निकामी होण्याचा धोका असल्याने लहान मुलांच्या डॉक्टरना बोलावून भूल देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली आणि फुप्फुसात अडकलेला खोबऱ्याचा तुकडा काढण्यात आला. ५ एप्रिलला या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला.
राधानगरी तालुक्यातील धामणवाडी येथील चार वर्षांच्या मुलाने एक रुपयाचे नाणे गिळल्याचा संशय आल्याने सीपीआर रुग्णालयामध्ये आणण्यात आले. त्याला उलट्याही झाल्या होत्या. एक्सरे काढल्यानंतर अन्ननलिकेच्या सुरुवातीलाच हे नाणे अडकल्याचे एक्सरेमध्ये स्पष्ट दिसत होते. पूर्ण भूल देऊन अखेर हे नाणे काढण्यात आले. अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक, घसा विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे, डॉ. वासंती पाटील, डाॅ. मिलिंद सामानगडकर, भूलशास्त्र डॉ. उल्हास मिसाळ यांनी या शस्त्रक्रिया केल्या. खासगी रूग्णालयात या शस्त्रक्रियांसाठी मोठा खर्च आला असता. या विभागाच्या वतीने अनेक अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात येत आहेत.
०८०४२०२१ कोल सीपीआर
चार वर्षांच्या मुलाने गिळलेले नाणे