सर्दी -- आयुर्वेद
By admin | Published: February 10, 2017 09:22 PM2017-02-10T21:22:40+5:302017-02-10T21:22:40+5:30
माणसाने जनावरांप्रमाणे भूक, तहान व झोप याकडे नैसर्गिकरीत्या लक्ष दिले, तर त्याला ‘पाणी किती प्यावे’ हे शिकवायला लागणार नाही,
आज बाहेर थंडी फारच होती. सर्व मुले चिकित्सालयात आली तीच मुले शिंकत आणि नाक ओढत. सर्वच हैराण झाले होते.
‘सर, आयुर्वेदाने सर्दी, पडशाचा विचार कसा केला आहे?’ अंजलीने विचारले. आयुर्वेदाने सर्दीसारख्या विकाराचाही सूक्ष्म विचार केलाय. आज आपण ज्याला ‘अॅलर्जी’ म्हणतो; त्याचाही विचार आयुर्वेदाने केला आहे; पण प्रत्येक सर्दी अॅलर्जीनेच होते असे नाही. धुके, थंड वारा, धूळ ही तर सर्दीची कारणे आहेतच; पण ज्याचा आपण सहसा विचार करीत नाही ती कारणेही आयुर्वेदाने सांगितली आहेत. आजही सर्दीच्या रुग्णांमध्ये ती कारणे सापडतात. ती बंद केली की सर्दी जाते. फार बोलणे, फार झोपणे, फार जागणे, उशी न घेता झोपणे, फार पाणी पिणे, दूषित पाणी पिणे, अशी अनेक कारणे आयुर्वेदाने सांगितली आहेत. मुलांनो, अनेकवेळा अती पाणी पिणाऱ्यांमध्ये सर्दी हमखास झालेली पाहायला मिळते. माणसाने जनावरांप्रमाणे भूक, तहान व झोप याकडे नैसर्गिकरीत्या लक्ष दिले, तर त्याला ‘पाणी किती प्यावे’ हे शिकवायला लागणार नाही, असे वाटते.
नेहमी म्हणतात की, कुठलाही रोग बरा करायचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे तो होऊ नये याचीच काळजी घ्यावी; हे अक्षरश: खरे आहे. वर सांगितलेली कारणे टाळली तर निम्मी सर्दी कमी होते.
सर्व प्रकारच्या पडशात प्रथम जितके जमेल तितके निर्वात जागेत राहावे. पडसे जर पाण्यासारखे असेल, डोकेदुखी असेल, तर पंचकर्मापैकी स्नेहन (तेल लावणे), स्वेदन (शेकणे) व नस्थर (नाकात औषधी थेंब घालणे) हे जास्त उपयोगी पडतात. वमनाचाही चांगला उपयोग होतो. अंगात व डोक्याला बांधण्यासाठी ऊबदार अशा लोकरी कपड्यांचा वापर करावा. आपण खात असलेले अन्न हे पचायला हलके हवे. भाजलेले चणे, गूळ, जव, गहू, सुंठ, मिरी, पिंपळी यांचा वापर अन्नात करावा, सर्दी जर वातज असेल (तज्ज्ञ वैद्यांकडून खात्री करून घ्यावी.) तर दही जरूर खावे. वेखंड किंवा सुंठीचा उगाळून गंधासारखा लेप डोक्यावर घालण्यास हरकत नाही.
जर नाकाचा, डोळ्यांचा, घशांचा दाह होत असेल, तर ती सर्दी पित्ताची आहे, असे समजावे, अशावेळी ज्येष्ठमधाने सिद्ध केलेले तूप अधिक उपयोगी पडते. घशाचा दाह करणारे असे तिखट, तेलकट, मसालेदार पदार्ख खाऊ नयेत.
जर नाकातील स्त्राव जाड, चिकट असेल, डोके जड वाटत असेल, तर ती कफाची सर्दी समजावी, त्यावेळी मात्र आंबट पदार्थ, दूध व दुधाचे पदार्थ, फ्रीजमधले थंड पदार्थ, दुपारची झोप पूर्ण बंद करावी. कफाच्या सर्दीला थांबविण्याचा रामबाण उपाय म्हणजे झेपेल तेवढा उपवास करणे. पचायला अत्यंत हलके अन्न म्हणजे लाह्या, भात, मूग अशा प्रकारचे अन्न खावे. कफज सर्दीला वमन चांगले उपयोगी पडते.
सर्दीचा प्रसार अत्यंत वेगाने होतो. त्यामुळे सगळीकडे सर्दी वाढू नये, असं खरोखर सामाजिक भान असेल, तर तोंडावर हात न घेता शिंकू नये. शक्यतो रुमालावर निलगिरीचे थेंब टाकून त्यांचा वापर शिंकताना करावा. अनेकांना शिंकताना, खोकताना साधा हातसुद्धा तोंडावर ठेवण्याचे भान नसते. अशा कारणाने हे रोग फार लवकर पसरतात. रस्त्यातून जाताना कुठेही थुंकू नये. (हे ही माणसाला शिकवावे लागते, हे आर्श्चयच।) अनेक दुष्ट रोगांचा त्यामुळे फैलाव होतो, हे आपण सुजाण नागरिक विसरतो. सर्दीच्या निमित्ताने ‘स्वच्छ भारताचा’ असाही विचार करायला हरकत नसावी.
‘औषध घेतली तर सात दिवसांत आणि नाही घेतली तर आठवड्यात बरी होते,’ अशी बदनाम झालेली सर्दी आपण योग्य काळजी घेतली, तर चांगली आटोक्यात आणू शकतो.
‘आऽऽ..क्शी’ करतच सर्व उठल्हो; पण यावेळी त्यांनी न चुकता आपले रुमाल आपल्या नाकावर धरले होते. ----- डॉ. विवेक हळदवणेकर--(लेखक प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ आहेत)