करवीरच्या तहसीलदारपदी शीतल मुळे-भामरे: पुणे विभागातील १८ तहसीलदारांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 04:22 PM2019-09-09T16:22:23+5:302019-09-09T16:24:22+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील १८ तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील नऊ जणांचा समावेश आहे.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील १८ तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील नऊ जणांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांची करवीर तहसीलदारपदी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अपर्णा मोरे यांची शिरोळ तहसीलदारपदी, कागलचे तहसीलदार बी. जे. गोरे यांची कवठेमहांकाळ तहसीलदारपदी, तहसीलदार (संगायो) दिनेश पारगे यांची गडहिंग्लजला तहसीलदारपदी बदली झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यपालांच्या आदेशानुसार महसूल विभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी पुणे विभागातील १८ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये करवीरचे तहसीलदार सचिन गिरी यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर महसूल तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांची बदली झाली आहे. भामरे यांच्या जागेवर पुणे येथील तहसीलदार (संगायो) सुनीता नेर्लीकर यांची बदली झाली.
शिरोळ तहसीलदार गजानन गुरव यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अपर्णा मोरे यांची बदली झाली. कागलचे तहसीलदार बी. जे. गोरे यांची कवठेमहांकाळ (जि. सांगली) तहसीलदारपदी बदली झाली.
त्यांच्या जागेवर कवठेमहांकाळ तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची बदली झाली.
शाहूवाडीचे तहसीलदार चंद्रशेखर सानप यांची महसूल तहसीलदार (सांगली जिल्हाधिकारी कार्यालय)पदी, त्यांच्याजागेवर शिरूर (जि.पुणे)चे तहसीलदार गुरू बिराजदार यांची, गडहिंग्लजचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांची महसूल तहसीलदार (सांगली जिल्हाधिकारी कार्यालय)पदी, जिल्हा करमणूक अधिकारी सुषमा पाटील यांची महाबळेश्वर (जि. सातारा)तहसीलदारपदी, हातकणंगले तहसीलदार सुधाकर भोसले यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्याने रिक्त जागेवर आजरा तहसीलदार प्रदीप उबाळे यांची, तहसीलदार (संगायो) दिनेश पारगे यांची गडहिंग्लज तहसीलदारपदी, पुनर्वसन तहसीलदार मैमुनिसा संदे यांची पारगे यांच्या रिक्त जागेवर बदली झाली.
निवडणूक तहसीलदार अरुणा गायकवाड यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर कडेगाव (जि.सांगली)च्या तहसीलदार अर्चना शेटे यांची बदली झाली.
कोल्हापूरशी संंबंधित तहसीलदारांच्या बदल्या
मावळ (जि.पुणे) येथील तहसीलदार रणजित देसाई यांची मिरज तहसीलदारपदी, सांगलीचे महसूल तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांची सांगोला येथे बदली झाली आहे. देसाई यांनी कोल्हापूर शहर पुरवठा अधिकारी तर खरमाटे यांनी करवीर तहसीलदारपदी काम केले आहे.