कोल्हापुरात थंडीची चाहूल : तापमान १७ डिग्रीपर्यंत घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:05 PM2019-11-27T12:05:13+5:302019-11-27T12:06:58+5:30
साधारणत: आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आपल्याकडे थंडी सुरू होते. नोव्हेंबर महिन्यात ती हळूहळू वाढत जाते; पण परतीच्या पावसाने ऋतुमानच बदलून गेले. नोव्हेंबर महिना निम्मा झाला तरी थंडीचा पत्ताच नव्हता.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची चाहुल लागली असून, तापमानात १७ डिग्रीपर्यंत घसरण झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडी हळूहळू वाढू लागली आहे. यंदा जुलै-आॅगस्ट महिन्यांत अतिवृष्टी आणि आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परतीचा पाऊस राहिला.
साधारणत: आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आपल्याकडे थंडी सुरू होते. नोव्हेंबर महिन्यात ती हळूहळू वाढत जाते; पण परतीच्या पावसाने ऋतुमानच बदलून गेले. नोव्हेंबर महिना निम्मा झाला तरी थंडीचा पत्ताच नव्हता. ढगाळ वातावरणासह कडक ऊन राहिले; मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून कोल्हापूर शहर व जिल्ह्यात थंडीची चाहुल लागली आहे. मध्यरात्रीपासून थंडी वाढत जाते, सकाळी सातपर्यंत तीव्रता कायम राहते; मात्र त्यानंतर दिवसभर हवेत गारवा जाणवत नाही.
सायंकाळी मात्र पुन्हा थंडी जाणवू लागते.
मंगळवारी किमान तापमान १७, तर कमाल ३२ डिग्रीपर्यंत राहिले. रात्री आठ पर्यंत साधारणत: १८-१९ डिग्रीपर्यंत तापमान राहिले, त्यानंतर घसरण होत ते १७ डिग्रीपर्यंत पोहोचले. आगामी तीन-चार दिवस जिल्ह्याचे तापमान असेच राहणार आहे. थंडीची चाहुल लागल्याने उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी होऊ लागली. स्वेटर, कानटोपी या कपड्यांसह उबदार पांघरुण असणाऱ्या दुकानात गर्दी पाहावयास मिळत आहे.
दाट धुक्याची प्रतीक्षा!
नोव्हेंबर महिन्यात दाट धुक्याच्या पांघरुणासह गुलाबी थंडी सगळीकडे पाहावयास मिळते; मात्र यंदा अद्याप दाट धुक्याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.
लहान मुले, वयोवृद्धांना सांभाळा
थंडी सुरू झाल्याने याचा सर्वांत जास्त त्रास लहान मुले, वयोवृद्धांना होणार आहे. सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू होऊ शकतो, असे मत डॉक्टरांचे आहे.