थंडीची लाट, पारा १२ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:21 AM2020-12-23T04:21:14+5:302020-12-23T04:21:14+5:30
कोल्हापूर : उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे दोन दिवसांपासून कोल्हापुरातही थंडीची लाट आली आहे. किमान तापमानाचा पारा १२ अंशापर्यंत खाली ...
कोल्हापूर : उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे दोन दिवसांपासून कोल्हापुरातही थंडीची लाट आली आहे. किमान तापमानाचा पारा १२ अंशापर्यंत खाली घसरला आहे. हे तापमान चालू हंगामातील नीच्चांकी ठरले आहे. गेल्या वर्षी याचदिवशी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस इतके होते. पारा घसरल्याने जनजीवन गारठले असून दुपारचे ऊन उबदार शालीसारखे वाटत आहे. या महिनाअखेरपर्यंत कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून अख्खा उत्तर भारत थंडीचा प्रकाेप अनुभवत आहे. कोल्हापुरातही गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुनरागमन झाले, पण म्हणावी तशी तीव्रता नव्हती. मात्र, चार दिवसांपासून अचानक कडाका वाढू लागला. रविवार, सोमवारी तर थंडीने कहरच केला. दिवसभर झोंबणारे वारे आणि रात्री कापरे भरवणाऱ्या या थंडीमुळे अवघे जनजीवनच गारठून गेले. संध्याकाळी पाचपासूनच अंगात कापरे भरण्यास सुरुवात होते. सकाळी दहा वाजेपर्यंत थंडी कायम राहते. दुपारी उन्हामुळे तीव्रता कमी वाटते. मंगळवारीदेखील हीच परिस्थिती कायम राहिली. थंडीचे दिवस सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच कोल्हापूरचा पारा १२ अंशापर्यंत खाली गेला आहे. यामुळे संपूर्ण कोल्हापूर गारठून गेले आहे. तीव्र थंडीमुळे पहाटे होणाऱ्या कामावर परिणाम होत असून वृक्षवेली, पशु पक्ष्यांवरही याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. हाडे गोठवणाऱ्या या थंडीमुळे आबालवृध्दांना घराबाहेर पडण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे सकाळी आठपर्यंत रस्त्यांवरची गर्दीही कमी दिसत असून मार्निंग वाॅकवरही परिणाम झाला आहे. उबदार कपड्यांमध्ये लोक वावरताना दिसत आहेत.
चौकट ०१
रात्र परीक्षा पाहणारी
गेल्या दोन दिवसांपासून मध्यरात्रीपासू्न पहाटे सहापर्यंत नीच्चांकी तापमान नोंदवले जात आहे. रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत पारा १२ अंशावर कायम राहत आहे. दिवसाचे तापमान २६ ते ३१ अंशापर्यंत आहे तर किमान तापमान १६ वरुन १२ अंशापर्यंत खाली वर होताना दिसत आहे. असह्य होणाऱ्या थंडीमुळे रात्र अक्षरश: परीक्षा पाहणारी ठरत आहे.
चौकट ०२
पुढील आठवडाही कडाक्याच्या थंडीचा
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गुरुवार व शुक्रवारी काहीसा कडाका कमी होणार असला तरी तो शनिवारनंतर पुन्हा वाढणार आहे. तापमानाचा पारा १३ ते १४ अंशापर्यंत खाली येणार असल्याने या महिनाअखेरपर्यंत असेच कापऱ्या भरवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.
चौकट ३
पुढील आठवड्याचे संभाव्य तापमान
चौकट ०४
२४ तासातील तापमानाची नोंद
रात्री १२ वाजता : १७ अंश सेल्सिअस
मध्यरात्री १ ते २ वाजता : १६ अंश सेल्सिअस
मध्यरात्री ३ वाजता : १५ अंश सेल्सिअस
पहाटे ४ वाजता : १४ अंश सेल्सिअस
पहाटे ५ वाजता : १२ अंश सेल्सिअस
सकाळी ६ वाजता : १३ अंश सेल्सिअस
चौकट ०५
पुढील आठवड्यातील संभाव्य तापमान
वार कमाल किमान
बुधवार ३० १३
गुरुवार ३१ १४
शुक्रवार ३३ १४
शनिवार ३२ १३
रविवार ३१ १३
सोमवार ३३ १४
मंगळवार ३३ १४