थंडी होणार गायब, पुन्हा बरसणार पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 14:29 IST2021-11-12T14:26:27+5:302021-11-12T14:29:59+5:30
दिवाळीनंतर आला थंडीचा महिना म्हणत भरलेली हुडहुडी कोल्हापूरकरांसाठी ठरली क्षणिक. शनिवारपासून पावसाचा अंदाज

थंडी होणार गायब, पुन्हा बरसणार पावसाच्या सरी
कोल्हापूर : दिवाळीनंतर आला थंडीचा महिना म्हणत भरलेली हुडहुडी कोल्हापूरकरांसाठी क्षणिक ठरली आहे. दोन दिवस थंडीचा अनुभव घेत नाही, तोवर पुन्हा एकदा पावसाचे ढग दाटू लागले आहेत. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, कोल्हापुरातही शनिवारपासून (दि. १३) आठवडाभर पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या चार दिवसांपासून थंडीचे आगमन झाले आहे. मध्यरात्री तापमान खाली जात असून, पहाटे तर चांगलीच हुडहुडी भरत आहे. दोन दिवसापासून तर कडाका जास्तच वाढला होता. दिवसभर अंगातील थंडीही जात नव्हती. गुरुवारी सकाळीही अशीच परिस्थिती होती; पण दुपारनंतर वातावरण एकदम पालटण्यास सुरुवात झाली. आभाळात ढगांची दाटी सुरू झाली. उन्हाचा तडाखा नसला तरी त्यात गारवाही नव्हता. दमट वातावरणाचा अनुभव येत हाेता. दिवसाचे कमाल तापमानही ३० ते ३१ अंशावर गेले होते. रात्रीचे तापमान २० ते २१ अंश सेल्सिअसवर गेले. त्यामुळे थाेडी थंडी थोडा उष्मा असा संमिश्र अनुभव येत आहे.
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासूनच संपूर्ण आठवडा हा बऱ्यापैकी पावसाचाच असणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले असल्याने परतीच्या पावसाने तडाखा देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका कोल्हापूरलाही बसणार आहे. आता गळीत हंगामाने जोर धरला आहे. त्यात पावसाने व्यत्यय आणला तर तोडणी कामावर परिणाम होणार आहे. सध्या खरिपातील भाताची काढणी अंतिम टप्प्यात आहे. हा पाऊस तसा नुकसानकारक असला तरी रब्बी पिकांसाठी मात्र महत्त्वाचा ठरणार आहे. जिरायती क्षेत्रावरील हरभरा, ज्वारीच्या पिकासाठी पावसाची नितांत गरज आहे. आडसाली ऊस लागवडीच्या वाढीसाठीदेखील हा पाऊस पोषक ठरणार आहे.