ध्वजदिन निधी संकलनासाठी सहकार्य करा : अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार; निधी संकलनास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:21 AM2020-12-08T04:21:05+5:302020-12-08T04:21:05+5:30
कोल्हापूर : देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हजारो शूरवीरांनी प्राणांची आहुती दिली आहे. त्याची परतफेड कोणत्याही स्वरूपात करू शकत नाही. ...
कोल्हापूर : देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हजारो शूरवीरांनी प्राणांची आहुती दिली आहे. त्याची परतफेड कोणत्याही स्वरूपात करू शकत नाही. मात्र, सशस्त्र सेना ध्वजदिनाचे औचित्य साधून नागरिकांनी निधी संकलनास हातभार लावून खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी सोमवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शिवाजी पवार, संयोजक चंद्रशेखर पांगे उपस्थित होते.
प्रास्ताविकात शिवाजी पवार यांनी निधी संकलनाची माहिती दिली. ते म्हणाले, ७ डिसेंबरपासून हा निधी गोळा केला जातो. युद्धात किंवा युद्धजन्य परिस्थितीत अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. गतवर्षी एक कोटी ६० लाख ७९ हजार इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे उद्भवलेल्या स्थितीतही ९० लाखांचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
अप्पर जिल्हाधिकारी पवार म्हणाले, युद्धभूमीवर तसेच अतिरेक्यांच्या भ्याड कारवायांमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देणाऱ्या योद्ध्यांच्या बलिदानाची आपण कोणत्याही स्वरूपात परतफेड करू शकत नाही; परंतु त्यांचे कुटुंबीय, अवलंबितांचे पुनर्वसन करून अंशत: का होईना परतफेड करू शकतो. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी मदत करावी. चंद्रशेखर पांगे यांनी आभार मानले.
--
फोटो नं ०७१२२०२०-कोल-निधी संकलन
ओळ : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, शिवाजी पवार, चंद्रशेखर पांगे, आदी उपस्थित होते.
---
इंदुमती गणेश