सहकाराला उतरती कळा...

By Admin | Published: December 26, 2014 10:58 PM2014-12-26T22:58:49+5:302014-12-26T23:48:19+5:30

वसंतदादा शेतकरी बँकेत अडकलेले महापालिकेचे कोट्यवधी रुपये तसेच बँक अडचणीत आल्याचा मुद्दा

The collapse of the co-operation ... | सहकाराला उतरती कळा...

सहकाराला उतरती कळा...

googlenewsNext

सांगली : गेल्या अनेक वर्षांपासून सहकारी संस्थांना लागलेले अधोगतीचे ग्रहण या वर्षातही कायम राहिले. उतरती कळा सुरू असतानाच अनेक सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी हे वर्ष गाजले. वसंतदादा शेतकरी सहकारी बँक, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना, निनाईदेवी, यशवंत, तासगाव साखर कारखाना, जिल्हा बँक, मिरज अर्बन बँक अशा अनेक सहकारी संस्थांमधील घडामोडी चर्चेत राहिल्या. तासगाव साखर कारखान्याचा प्रश्न सर्वात जास्त गाजला. या कारखान्याच्या प्रश्नावरून आर. आर. पाटील व खासदार संजय पाटील यांच्यात पुन्हा विस्तव पडला. त्याचे पडसाद लोकसभा, विधानसभा निवडणुकीत उमटले. निवडणुकीतही सहकाराचा मुद्दा चर्चेचा ठरला.
वसंतदादा शेतकरी बँकेत अडकलेले महापालिकेचे कोट्यवधी रुपये तसेच बँक अडचणीत आल्याचा मुद्दा विधानसभेच्या निवडणुकीत गाजला. त्यामुळे सहकारी संस्थांची अधोगती राजकीय मैदानातील कळीचा मुद्दा बनला होता. या प्रश्नाभोवतीच राजकारणही करण्यात आले. सहकार क्षेत्राची ही अवस्था संपूर्ण जिल्हाभर दिसून आली. बंद पडणारे कारखाने, त्यांचे खासगीकरण आणि या संस्थांमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे यावर्षी गाजली.
महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६0 मधील कलम ८३ नुसार झालेल्या चौकशीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत तब्बल ४ कोटी १८ लाख १६ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाल्याने वर्षाखेरीस राजकीय वर्तुळात खळबळ माजली. दहा वर्षातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संचालक मंडळांनी केलेला कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. आता याच भ्रष्टाचाराच्या जबाबदारी निश्चितीचे काम सध्या सुरू झाले आहे. आगामी वर्षात आता याच घोटाळ्यावरून राजकीय वाद पेटण्याची चिन्हे आहेत. याच वर्षात जिल्ह्यात चार बाजार समित्या बरखास्त करण्यात आल्या. जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वारेही वाहू लागले आहे. क व ड गटातील निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली असून नव्या वर्षात होणाऱ्या मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी वर्षाखेरीस राजकीय मंडळींनी ‘फिल्डिंग’ लावली आहे.

कारखान्याची जागाविक्री
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक अडचणींमुळे कारखान्याच्या दर्शनी बाजूची जागा विक्रीस काढण्याचा निर्णय या वर्षात झाला. सध्या जागाविक्रीची प्रक्रिया सुरू आहे. कारखान्यासमोरील आर्थिक विघ्न अजूनही कायम आहे. कामगारांची देणी, बँकेचे कर्ज अशा अनेक आर्थिक गोष्टींच्या दुष्टचक्रात हा कारखाना अडकला आहे. गेले वर्षभर कारखानाही अनेक मुद्यांवरून चर्चेत राहिला.


एकमेव जिल्हा बँकेचा दिलासा...
सहकारी संस्थांच्या पडझडीच्या कालावधित जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय सहकार क्षेत्राच्या पथ्यावर पडला. प्रशासक शैलेश कोथमिरे तसेच येथील कर्मचारी वर्गाने या बँकेला अडचणीतून बाहेर काढले. योग्य नियोजन आणि पारदर्शी कारभार असेल तर सहकारी संस्थाही चांगल्या पद्धतीने चालविल्या जाऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिले.

एकमेव जिल्हा बँकेचा दिलासा...
सहकारी संस्थांच्या पडझडीच्या कालावधित जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय सहकार क्षेत्राच्या पथ्यावर पडला. प्रशासक शैलेश कोथमिरे तसेच येथील कर्मचारी वर्गाने या बँकेला अडचणीतून बाहेर काढले. योग्य नियोजन आणि पारदर्शी कारभार असेल तर सहकारी संस्थाही चांगल्या पद्धतीने चालविल्या जाऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिले.

Web Title: The collapse of the co-operation ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.