खचलेल्या रस्त्याचा महामंडळाने केला पंचनामा
By admin | Published: November 6, 2014 12:23 AM2014-11-06T00:23:02+5:302014-11-06T00:40:21+5:30
अधिकारी धारेवर : रस्ते प्रकल्पाची किंमत ३२५ कोटी
कोल्हापूर : आयआरबीला किमान ३२५ कोटी रुपये देणे द्यावे लागेल, असे मूल्यांकन समितीच्या अहवालात म्हटल्याचे स्पष्ट झाल्याने आज, बुधवारी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील व टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी या एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. महामंडळाने फुलेवाडीतील खचलेल्या रस्त्याची पाहणी करून त्यांना पंचनामा करण्यास कृती समितीने भाग पाडले.
प्रा. एन. डी. पाटील यांच्या रुईकर कॉलनीतील घरी कृती समितीचे कार्यकर्ते व महामंडळाचे अधिकारी यांची बैठक झाली. दोन वर्षांच्या आत रस्ता खचला, आतापर्यंत ३२ लोकांना अपघातांमध्ये जीव गमवावा लागला, युटिलिटी शिफ्टिंग झालेले नाही, पावसाळ्यात रस्त्यांना डबक्याचे स्वरूप येते, अशा कामाबद्दल समाधानी नसल्याचे अहवाल का दिला नाही. महामंडळाने न्यायालयात ‘आयआरबी’ची तरफदारी केली, असा आरोप एन. डी. पाटील व समितीच्या कार्यकर्त्यांनी केला. फुलेवाडी रस्ता खचितप्रकरणी पंचनामा करून ‘आयआरबी’वर महामंडळाने गुन्हा दाखल करावा. त्यानंतरच येथून आपली सुटका होईल, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.
यावेळी शिंदे यांनी महामंडळाचे मुख्य अभियंता बी. एन. ओहोळ यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. एन. डी. पाटील यांनीही प्रकल्पाबाबत महामंडळाच्या हलगर्जीपणाबाबत जाब विचारला. याबाबत लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
अधिकारी निरूत्तर
महामंडळाने श्री. कृष्णराव यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने २४ जुलै २०१४ ला शहराचा दौरा क रून प्रकल्पाची माहिती घेतली. त्यानंतर आजअखेर या समितीचा अहवाल मागणी करूनही महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाला नाही. कृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी समितीने प्रकल्पाची ३२५ कोटी रुपये किंमत ठरविल्याचे सांगितले. ७० टक्क्यांपेक्षा अधिक काम झालेले नाही, तरीही २२० कोटी रुपये प्रकल्पाचे ३२५ कोटी कसे झाले. युटिलिटी शिफ्टिंग व आयआरबीला महापालिकेच्या दिलेल्या जागेच्या किमतीचे काय ? असा सवाल प्रा. एन. डी. पाटील यांनी उपस्थित करताच महामंडळाचे अधिकारी निरूत्तर झाले.