यड्रावच्या दूषित पाण्याचे नमुने जमा

By admin | Published: December 31, 2015 12:14 AM2015-12-31T00:14:20+5:302015-12-31T00:16:19+5:30

प्रदूषण मंडळ अधिकाऱ्यांची पाहणी : प्रोसेसधारक, अधिकारी व आंदोलकांत वादावादी--लोकमतचा प्रभाव

Collected water samples of Yadrav | यड्रावच्या दूषित पाण्याचे नमुने जमा

यड्रावच्या दूषित पाण्याचे नमुने जमा

Next

यड्राव : येथील बिडला प्रोसेसच्या रसायनयुक्त पाण्यामुळे पिण्याचे पाणी दूषित बनत असल्याचा प्रश्न ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली. बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून येथील पाण्याचे नमुने परीक्षणासाठी घेतले. यावेळी प्रोसेसधारक, प्रदूषण विभागाचे अधिकारी व आंदोलक यांच्यात वादावादीचा प्रसंग उद्भवला. दरम्यान, अहवाल आल्यानंतर संबधित प्रोसेसधारकांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले.
यड्राव येथे रामगोपाल बिडला टेक्स्टाईल या कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगातून रसायनयुक्त पाणी उघड्यावर सोडल्यामुळे दुर्गंधी पसरून विहीर व कूपनलिकेचे पाणी घातक बनले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘आंदोलनानंतर प्रदूषण मंडळ कारवाई करणार का’ या मथळ्याखाली बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अधिकाऱ्यांनी दूषित पाण्याच्या ठिकाणी पाहणी केली. त्यानंतर संबंधित विहिरी व कूपनलिका तसेच त्याठिकाणी साचलेल्या रसायनयुक्त पाण्याचे नुमने घेतले.
दरम्यान, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या ठिकाणी आल्याचे समजताच परिसरातील नागरिक, स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपचे कार्यकर्ते जमा झाले. यावेळी बिडला प्रोसेसचे संजय बिडला, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी डॉ. राजेश आवटी यांच्यावर येथील रहिवाशांनी व ‘स्वाभिमानी’चे विश्वास बालिघाटे, भाजपचे आनंदराव साने, औरंग शेख यांनी प्रश्नांचा भडीमार केला मोठ्या प्रमाणात कर भरून सुद्धा आम्हाला सोयी उपलब्ध होत नसल्यामुळे पाणी कुठे सोडणार, असा प्रश्न बिडला यांनी उपस्थित केला. यावेळी आंदोलक संतप्त होऊन त्यांच्यात वादावादी झाली. भाजपने येत्या चार दिवसांत कारवाई न झाल्यास ४ जानेवारीला रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी भूपाल पाटील, शिवानंद बिद्रे, बंडू उपाध्ये, बंडू पाटील, रोहित मालगावे यांच्यासह कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.

कारवाई : नव्या वर्षात होणार
पार्वती औद्योगिक वसाहतीमधील सर्व प्रोसेसना इटीपी कार्यान्वित करण्याबाबत दोन महिन्यांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याची मुदत ३१ डिसेंबरला संपत असून, १ जानेवारीपासून याबाबतची कार्यवाही सुरू करणार आहे, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी
डॉ. राजेश आवटी यांनी सांगितले.
तुम्ही ‘एसी’मध्ये बसता, शुद्ध पाणी पिता; परंतु तुमच्या प्रोसेसमधून आलेले दूषित पाणी आमच्या जमिनीत गेल्याने जमीन नापीक झाली. विहिरीचे पाणी आम्हाला पिण्यायोग्य नाही, तर जनावरांना ते पिता येत नाही. शेतकऱ्यांचे दु:ख तुम्हाला काय कळणार? अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलक विश्वास बालिघाटे यांनी व्यक्त केली

Web Title: Collected water samples of Yadrav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.