रोज आठशे लिटर दुधाचं रूपालीच्या रिक्षातून संकलन
By admin | Published: March 7, 2017 10:55 PM2017-03-07T22:55:06+5:302017-03-07T22:55:06+5:30
खराडेतील महिलेची यशोगाथा : डेअरी व्यवसाय; दररोज आठ गावांत रपेट
संजय पाटील --- कऱ्हाड
‘चूल आणि मुलं’ हेच स्त्रियांचं काम, असं आत्तापर्यंत म्हटलं जायचं; पण सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातील महिलाही उंबरठ्याबाहेर पडल्या असून, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करताना दिसतायत. खराडे, ता. कऱ्हाड येथील रूपाली जाधव यांनीही प्रापंचिक जबाबदारी सांभाळत डेअरी व्यवसायात स्वत:चे नाव निर्माण केले आहे. पतीसोबत त्याही हा व्यवसाय हिंमतीने सांभाळत आहेत.
खराडे येथील रूपाली जाधव यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले आहे. त्यांचे सासर खराडे तर माहेर मत्यापूर-नागठाणे. तेरा वर्षांपूर्वी त्यांचा खराडेतील बजरंग जाधव यांच्याशी विवाह झाला. सुरुवातीच्या काळात दोघेही शेती करत होते. त्यानंतर बजरंग जाधव यांनी सायकलवरून दूध संकलन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ते गावातच दूध संकलन करीत होते. कालांतराने त्यांचा हा व्यवसाय विस्तारला. रूपाली यांनीही घरकाम करीत व शेती सांभाळत या व्यवसायात पतीला मदत करण्यास सुरुवात केली. या दाम्पत्याने सुरुवातीच्या काळात हा व्यवसाय फक्त खराडे गावापुरता मर्यादित सुरू केला. त्यानंतर त्याचा विस्तार त्यांनी माल वाहतूक रिक्षा घेतली. या रिक्षातून त्यांनी दूध संकलन सुरू केले.
सुरुवातीला बजरंग जाधव हे दूध संकलनासाठी रिक्षा घेऊन जात होते. तर रूपाली घरातील जबाबदारी पाहत होत्या. मात्र, मध्यंतरीच्या कालावधीत व्याप वाढल्याने बजरंग यांनी रिक्षावर चालक नेमला. संबंधित चालक दररोज परिसरातील गावातून दूध संकलन करीत होता. काहीवेळा रूपाली याही चालकाच्या मदतीसाठी जात होत्या. त्यादरम्यान पती बजरंग यांची मदत घेऊन रूपाली रिक्षा चालविण्यास शिकल्या. काही महिन्यांनंतर चालकाने काम बंद केल्यामुळे जाधव यांचा दूध संकलनाचा व्यवसाय ठप्प झाला. घरात रिक्षा असूनही फक्त चालक नसल्यामुळे दूध संकलन थांबले. अखेर रूपाली यांनी संकलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय बंद पडू द्यायचा नाही, असा निर्धार करीत त्या एकट्याच रिक्षा घेऊन दूध संकलनासाठी बाहेर पडल्या. खराडे गावाबरोबरच चिंचणी, हेळगाव, वाण्याचीवाडी, कचेरवाडी, हणबरवाडी, बेलवाडी, कालगाव आदी गावांतून त्यांनी दूध संकलन सुरू केले. दूध संकलनासाठी रूपाली सकाळी साडेसात वाजता घरातून बाहेर पडायच्या. त्यापूर्वी घरकाम, जेवण, धुणीभांडी आदी कामे आटोपली जायची. घरातील कामे आटोपल्यानंतर रिकामे कॅन रिक्षामध्ये भरून त्या घराबाहेर पडायच्या. दूध संकलन करायच्या व अकरा वाजेपर्यंत परत घरी यायच्या.
दररोज आठशे लिटर दूध संकलन
खराडेसह आसपासच्या गावात दररोज सकाळी रूपाली जाधव आपली रिक्षा घेऊन जातात. संबंधित रिक्षात रिकामे कॅन ठेवलेले असतात. प्रत्येक शेतकऱ्याकडील दूध घेऊन ते मोजायचे व कॅनमध्ये भरायचे काम रूपाली यांनाच करावे लागते. त्या दररोज सातशे ते आठशे लिटर दूध संकलित करतात.
खराडे, ता. कऱ्हाड येथील रूपाली जाधव या रिक्षातून दूध संकलन करतात.