‘गोकुळ’चे संकलन १२ हजार लिटरने घटले, पुराच्या पाण्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 04:07 PM2019-08-01T16:07:34+5:302019-08-01T16:12:13+5:30
पुराच्या पाण्याचा फटका ‘गोकुळ’च्या दूध संकलनावर झाला असून, बुधवारचे संकलन १२ हजार लिटरने कमी झाले आहे. गगनबावडा, बाजार भोगाव परिसरात पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प झाल्याने संघापर्यंत दूध पोहोचू शकलेले नाही.
कोल्हापूर : पुराच्या पाण्याचा फटका ‘गोकुळ’च्या दूध संकलनावर झाला असून, बुधवारचे संकलन १२ हजार लिटरने कमी झाले आहे. गगनबावडा, बाजार भोगाव परिसरात पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प झाल्याने संघापर्यंत दूध पोहोचू शकलेले नाही.
जिल्ह्यात गेले तीन-चार दिवस जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. ८१ बंधारे पाण्याखाली गेले आहेतच, त्याशिवाय अनेक मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी राधानगरी, कडवी, कासारी, वारणा धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी वाढत आहे.
पुराच्या पाण्याचा फटका सर्वच घटकांना बसत असून, ‘गोकुळ’च्या दूध संकलनावरही त्याचा परिणाम झाला आहे. गगनबावडा, धामणी खोरा व बाजार भोगाव परिसरातून होणारी दुधाची वाहतूक ठप्प झाली आहे. बाजारभोगावजवळ कासारी नदीच्या पुराचे पाणी आल्याने त्यापुढील सर्व मार्ग बंद झाले आहेत. तर लोंघे येथे पाणी आल्याने गगनबावड्यासह तळकोकणाचा संपर्क तुटला आहे.
गगनबावड्यात बल्ककुलर असला, तरी तिथे तीन वेळचे संकलनच होऊ शकते; त्यामुळे मंगळवारी (दि. ३0) रात्री व बुधवारी सकाळपासूनचे दूध संकलन ठप्प झाले आहे. बुधवारी ‘गोकुळ’चे संकलन १२ हजार लिटरने कमी झाल्याची माहिती संघ प्रशासनाने दिली.