सामुहिक राष्ट्रगीताने जागवली देशभक्तीची प्रेरणा, कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By इंदुमती सूर्यवंशी | Published: August 17, 2022 02:23 PM2022-08-17T14:23:56+5:302022-08-17T15:50:03+5:30
बिंदू चौक, मध्यवर्ती बसस्थानक, अंबाबाई मंदिर यासह शहरातील चौकाचौकात सामुहिकरित्या राष्ट्रगीत गाण्यात आले.
कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशभक्तीची प्रेरणा जागवत आज, बुधवारी कोल्हापुरातील चौकाचौकात, शासकीय, खासगी कार्यालये, शाळा महाविद्यालयांमध्ये सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाले. यावेळी झालेल्या भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने आसमंत दणाणून गेले. यानिमित्ताने शाहू कृतज्ञता पर्वनंतर पुन्हा एकदा कोल्हापूर काही सेकंदासाठी स्तब्ध झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच महसूल विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य शासनाने स्वराज्य महोत्सवांतर्गत १० तारखेला हा उपक्रम जाहीर केला होता. मंगळवारी शासनाच्यावतीने सर्व आस्थापनांना राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी अकरा वाजता शहरातील बिंदू चौक, मध्यवर्ती बसस्थानक, अंबाबाई मंदिर यासह शहरातील चौकाचौकात सामुहिकरित्या राष्ट्रगीत गाण्यात आले. त्यासाठी पोलीस, ट्रॅफिक पोलीस, एनसीसीचे विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला.
यासह शहरातील सर्व शासकीय, खासगी कार्यालये, आस्थापना, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ,पक्ष, संस्था, संघटनांच्या कार्यालयात 'सामूहिक राष्ट्रगीत गायन' झाले. उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.
'लोकमत'मध्ये राष्ट्रगीताचे गायन
लोकमत'च्या शहर कार्यालयात सकाळी ११ वाजता कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीताचे सामुहिक गायन केले. यानंतर भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. लोकमतने कायमच राष्ट्रभक्ती जागृत करणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. लोकमत'च्या एमआयडीसी येथील मुख्य कार्यालयात रोज तिरंगा ध्वज फडकवला जातो. व्यवस्थापनातील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी रोज आपल्या ह्दयाजवळ तिरंगा ध्वजाची प्रतिकृती लावतात. याशिवाय विद्यार्थी, महिला, नागरिकांमध्ये कायम राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत राहावी यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.