जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारला देवस्थानचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:24 AM2021-04-10T04:24:38+5:302021-04-10T04:24:38+5:30
कोल्हापूर : न्याय व विधी खात्याच्या आदेशाने बरखास्त झालेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत ...
कोल्हापूर : न्याय व विधी खात्याच्या आदेशाने बरखास्त झालेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी समितीच्या कार्यक्षेत्राची, जमिनी, अखत्यारितील मंदिरे, कर्मचारी, सध्या सुरू असलेली विकासकामे याबाबत सविस्तर माहिती घेतली.
भाजपचे वर्चस्व असलेली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्याचा आदेश बुधवारी उशिरा न्याय व विधी खात्याने काढला. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्यासह चार जणांचे सदस्य संपुष्टात आले आहे. समितीवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे एक वर्षासाठीचा पदभार देण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी समितीचे सचिव विजय पोवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची भेट घेतली.
शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे तसेच यात्रांवर सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहतील असे स्पष्ट केले. सचिव विजय पोवार यांनी त्यांचे स्वागत करून कामकाजाची माहिती दिली.
---