जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज जिल्हा परिषदेतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:16 AM2021-07-24T04:16:23+5:302021-07-24T04:16:23+5:30
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच महापुराचे पाणी घुसल्यानंतर आता ...
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच महापुराचे पाणी घुसल्यानंतर आता हे कार्यालयच जिल्हा परिषदेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. २०१९ मध्येही सलग १५ दिवस जिल्हा परिषदेतून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करण्यात आले होते. त्यामुळे महापुराच्या संकटात जिल्हा परिषद पुन्हा एकदा प्रशासनाचा आधार ठरली आहे.
गेले दोन दिवस जिल्ह्यात आणि शहरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने साहजिकच पंचगंगा नदी आणि जयंती नाल्याचे पाणी शहरात पसरले आहे. जयंती नाल्याची फूग थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आली आहे. पाणीच जाण्यासाठी वाव नसल्याने पावसाचे पाणीही जागीच साठून राहत आहे. परिणामी सकाळी १० नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सकाळी साडेअकरानंतर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेत हलवण्यास सुरुवात झाली. दुपारी जिल्हाधिकारी राहुल रेखाराव हे त्यांच्या अन्य अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेत दाखल झाले.
तत्पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सर्व विभागप्रमुखांना सूचना देत जिल्हा परिषद मुख्यालयातील यंत्रणा सक्रिय केली होती. दुपारी दोन नंतर पालकमंत्री सतेज पाटील, संध्याकाळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार, सर्व वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषदेत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत याच ठिकाणी जिल्ह्यातील महापुराच्या आपत्तीचे व्यवस्थापन सुरू होते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अन्य कामांपेक्षा आता महापुराच्या संकटावर मात करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन अन्य शासकीय, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सक्रिय झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयच जिल्हा परिषदेत आल्याने या ठिकाणचा माहोलच बदलून गेला आहे. २०१९ च्या महापुरावेळीही येथूनच व्यवस्थापन करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेतच बैठक घेतली होती.