जिल्हाधिकारी कार्यालयात मनोरूग्णाचा धुमाकूळ

By admin | Published: December 13, 2014 12:25 AM2014-12-13T00:25:06+5:302014-12-13T00:26:52+5:30

लाखमोलाचे कार्यालय असुरक्षित

Collectorate Office | जिल्हाधिकारी कार्यालयात मनोरूग्णाचा धुमाकूळ

जिल्हाधिकारी कार्यालयात मनोरूग्णाचा धुमाकूळ

Next

कोल्हापूर : राज्य सरकारच्या महसूल विभागाचे जिल्ह्याच्या ठिकाणचे महत्त्वाचे कार्यालय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाची ओळख आहे. सर्वाधिकार असलेले आणि सर्वांना आदेश देणारे हे कार्यालय! रात्रीचा एक पहारेकरी वगळता स्वत:ची अशी कोणतीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने हे कार्यालय रात्री- अपरात्री बेवारसच असते. या इमारतीत आज, शुक्रवारी सकाळी चक्क एका मनोरुग्णाने धुमाकूळ घातला! बेभान झालेल्या या मनोरुग्णाने एका खासगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकालाच काठीने दणकले. त्याच्या मर्कटलीलांनी हबकलेल्या कर्मचाऱ्यांनी मग पोलिसांना पाचारण करून त्याला जेरबंद केले.
आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक मनोरुग्ण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिरला. बघता-बघता तो निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उंच झाडावर चढला. ठेकेदाराने तेथे एक सुरक्षा रक्षक ठेवला आहे. त्याच्या हे लक्षात येताच त्याने त्या वेड्याला खाली उतरण्यास सांगितले; परंतु तो ऐकेना. मोठ्याने दरडावून पाहिले, हातातील काठीची भीती दाखवली; पण काहीच उपयोग होईना. तथापि, थोड्याच वेळात तो मनोरुग्ण स्वत:हून खाली उतरला आणि त्याने सुरक्षा रक्षकालाच काठीने बदडले. नंतर तेथून तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावर गेला. तेथे त्याने आरडाओरड करून दंगा करण्यास सुरुवात केली. हा मनोरुग्ण ‘स्वराज भवन’वर लावलेल्या तिरंगी झेंड्याच्या खांबाकडे गेला. त्याने झेंड्याची दोरीही हातात धरली. झेंड्याची दोरी खेचणार तोच कर्मचाऱ्यांनी त्याला ओरडून बिथरवले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. पुढे पुन्हा तो इकडून तिकडे ओरडत पळत सुटला. मनोरुग्णाचा हा धांगडधिंगा पाहून शाहूपुरी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ‘सरकारी प्रसाद’ देताच त्याची मर्कटलीला बंद पडली. पोलीस येईपर्यंत मात्र अर्धा-पाऊण तास एक पहारेकरी व कार्यालयात पोहोचलेल्या काही शिपाई मंडळींची पाचावर धारण बसली.


लाखमोलाचे कार्यालय असुरक्षित
जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक विभाग असून बऱ्याच अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. या कार्यालयात अत्यंत महत्त्वाच्या अशा हजारो फाईल्स, कागदपत्रे असतात; परंतु हे लाखमोलाचे कार्यालय सर्व बाजूंनी खुले व असुरक्षित आहे. त्याच्या सुरक्षेची फारशी कोणी गांभीर्याने दखल घेतलेली नाही. एकच पहारेकरी असल्याने त्याच्यावर मर्यादा येतात. त्यामुळे झालं ते झालं, भविष्यात तरी खबरदारी घेतली गेली पाहिजे.

Web Title: Collectorate Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.