राखीव निधीतून खर्च करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:29 AM2021-09-16T04:29:53+5:302021-09-16T04:29:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेला राखीव निधीतून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी रक्कम खर्च करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी अटी व शर्ती घालून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेला राखीव निधीतून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी रक्कम खर्च करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी अटी व शर्ती घालून मंजुरी दिली, तसेच त्या रकमेत पाच हप्ते करून देण्यात आले असून, एक कोटी ४० लाख ९८ हजार १६१ रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. त्यासाठी नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व लेखापाल यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
नगरपालिकेतील अ, ब, व क वर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी कामबंद आंदोलन केले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी राखीव निधीतील रक्कम वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्यानुसार ती रक्कम वापरून बुधवारी नगरपालिकेने कर्मचाऱ्यांचे पगार भागवले. याबाबतची पार्श्वभूमी अशी, नगरपालिकेने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयके देण्यासाठी राखीव निधीतून सात कोटी ४ लाख ९० हजार ७९९ रुपये जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वापरले. त्यापोटी पालिकेला १.१७ कोटींचा मासिक हप्ता राखीव निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात राज्य शासनाकडून जमा झालेल्या सहायक अनुदानाच्या सहा कोटी ५८ लाख २० हजार ८७६ रकमेतील १.१७ कोटीचा पहिला हप्ता राखीव निधीत जमा केला. त्यामुळे अ, ब व क वर्गातील कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी रक्कम कमी पडली. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला होता. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी वरीलप्रमाणे मंजुरी दिली.