जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 02:42 PM2021-08-03T14:42:30+5:302021-08-03T14:46:41+5:30
collector Office Flood Kolhapur : महापुरामुळे गेली दहा दिवस बंद असलेले जिल्हाधिकारी कर्यालय सोमवारी पुन्हा गजबजले. पुराच्या पाण्यात बुडालेल्या जुन्या इमारतीतील कर्मचारी दप्तर लावण्यात व्यस्त होते. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने अन्य विभागातील महसूलचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी आपआपल्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली.
कोल्हापूर : महापुरामुळे गेली दहा दिवस बंद असलेले जिल्हाधिकारी कर्यालय सोमवारी पुन्हा गजबजले. पुराच्या पाण्यात बुडालेल्या जुन्या इमारतीतील कर्मचारी दप्तर लावण्यात व्यस्त होते. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने अन्य विभागातील महसूलचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी आपआपल्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली.
जिल्ह्यात २१ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतदेखील महापुराने वेढली होती. निवासी उपजिल्हाधिकारी यांचे दालन आणि जमीन, गृह, गावठाण, नागपूर ऑडिट हे जुन्या इमारतीतील कार्यालय पाच फूट पाण्यात तर जिल्हाधिकारी बसतात ती नवीन इमारत ३ फूट पाण्यात होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज जिल्हा परिषदेतून सुरू होते.
चार दिवसांनी पुराचे पाणी ओेसरले, मात्र सर्वत्र गाळ आणि चिखल साचलेला होता. ही स्वच्छता करण्यातच चार पाच दिवस गेले, वरच्या मजल्यापर्यंत पाणी गेले नसले तरी विद्युत पुरवठा नसल्याने परिसरातील अन्य कार्यालये व विभागांचे कामकाजही ठप्प होते. अखेर तब्बल दहा दिवसांनंतर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ववत सुरू झाले. अन्य विभागांचे कामकाज पुन्हा सुरू झाले.
पाण्याखाली असलेल्या विभागातील कर्मचारी मात्र दप्तर लावण्यात गुंतले आहेत. येथील काही कागदपत्रे पाण्यात भिजली होती. ती वाळवली असली तरी पाण्यामुळे त्यांना बुरशी येण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
याबाबतची काळजी घेत कर्मचाऱ्यांना कागदपत्रे हाताळावी लागत आहेत. शिवाय फर्निचरचा ओलावा आहे. संगणकीय यंत्रणा, नेट कनेक्शन लावण्याचे काम सोमवारी सुरू होते. त्यामुळे या विभागातील प्रत्यक्ष कामकाज सुरू व्हायला आणखी किमान दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.