पोलीस ठाण्यांतील ‘कलेक्टरां’ची होणार उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:11 AM2019-04-29T01:11:42+5:302019-04-29T01:11:47+5:30
एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अवैध व्यावसायिकांकडून हप्तावसुलीचा धडाका लावणाऱ्या शहरातील पाचही पोलीस ठाण्यांतील ‘कलेक्टरां’ची पोलीस ...
एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अवैध व्यावसायिकांकडून हप्तावसुलीचा धडाका लावणाऱ्या शहरातील पाचही पोलीस ठाण्यांतील ‘कलेक्टरां’ची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात येणार आहे. रविवारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी संबंधित ‘कलेक्टरां’ची यादी मागवून घेतली. आपले नाव आणि फोन नंबर घेतल्याची माहिती समजताच वसुलीबहाद्दर ‘कलेक्टरां’नी मुख्यालयाकडे धाव घेत कानोसा घेतला.
खून किंवा गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे शाखा (डिटेक्शन ब्रँच- डीबी पथक) आहे. या पथकात काम करणारे अधिकारी व कर्मचारी गुन्ह्यांची उकल न करता स्वत:चे हित जपत रुबाब मिरविताना दिसतात. जिल्ह्यामध्ये ३२ पोलीस ठाणी आहेत; तर मुख्यालयात स्थानिक गुन्हे, आर्थिक गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी पथक, मानवी अत्याचार प्रतिबंधक पथक, आदी शाखा आहेत. या सर्व शाखांमध्ये दोन-तीन ‘कलेक्टर’ ठरलेले आहेत. प्रभारी अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळत ते हद्दीतील अवैध व्यावसायिकांकडून ठरलेला हप्ता घेतात. हप्तावसुली जोरात सुरू झाल्याने अवैध व्यवसाय फोफावले आहेत. म्हणूनच तर प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करण्याचे धाडस अवैध व्यावसायिकांनी केले. या अवैध व्यावसायिकांच्या मग्रुरीवर नियंत्रण ठेवायचे कोणी? असा प्रश्न कोल्हापूर पोलीस दलात होता.
जिल्ह्यात मटका, जुगार, दारू, सेक्स रॅकेट, क्लब यांसारखे अवैध धंदे आणि पोलिसांवर होणारे हल्ले यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख वादग्रस्त ठरले. त्यांनी अवैध व्यावसायिकांना लक्ष्य केले. त्यांच्याशी संपर्कात असणाºया पोलिसांची यादी मिळवून टेहळणी ठेवली होती. रविवारी डॉ. देशमुख यांनी ‘कलेक्टरां’ची यादी घेतली. त्यांच्या रीडरने दुपारी शहरातील लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी, शाहूपुरी, करवीर आणि स्थानिक गुन्हे शाखा येथील ठाणे अंमलदारांना फोन लावून ‘कलेक्टरां’ची नावे आणि फोन नंबर घेतले. या प्रकाराची माहिती समजताच संबंधित ‘कलेक्टरां’नी मुख्यालयाकडे धाव घेत कानोसा घेतला. त्यांना वायरलेसवरून निरोप धाडत ‘आहे त्या स्थितीत पोलीस मुख्यालयात हजर राहण्या’चे आदेश दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यालयाच्या प्रवेशद्वारात ड्यूटी
वर्षभरात पोलीस दलातील डझनभर कर्मचारी लाच घेताना सापडले. त्यामुळे जनतेमध्ये विश्वास निर्माण केलेल्या पोलीस दलाची अशा भ्रष्ट कर्मचाºयांच्या वर्तनामुळे नाचक्की झाली. तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी अवैध व्यावसायिकांशी साटेलोटे असणाºया तिघा ‘कलेक्टरां’ची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी केली होती. त्यांना दिवसभर मुख्यालयाच्या प्रवेशद्वारात उभे राहण्याची ड्यूटी लावली होती.