जिल्हाधिकाऱ्यांचे कामकाज पहाटे तीनपर्यंत; फायलींचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:26 AM2021-08-15T04:26:13+5:302021-08-15T04:26:13+5:30

समीर देशपांडे-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील दिवे पहाटे तीनपर्यंत सुरू ...

Collector's work till three in the morning; Disposal of files | जिल्हाधिकाऱ्यांचे कामकाज पहाटे तीनपर्यंत; फायलींचा निपटारा

जिल्हाधिकाऱ्यांचे कामकाज पहाटे तीनपर्यंत; फायलींचा निपटारा

Next

समीर देशपांडे-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील दिवे पहाटे तीनपर्यंत सुरू असलेले पाहावयास मिळत आहेत. नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांनी कोरोना, महापूर यांमुळे प्रलंबित असलेल्या फायलींचा निपटारा करण्यासाठी रात्रीचा दिवस करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मात्र कुचंबणा होत आहे. एकीकडे त्यांच्या गतिमान कारभाराची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे अनेकदा ते समोरील व्यक्तींचा सन्मान ठेवत नाहीत, अशीही तक्रार आहे.

शुक्रवारी (दि. १३) समाजकल्याण विभागाची ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात आणि ओळखपत्र देण्याबाबतच्या समितीची बैठक सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. बैठकीमध्ये ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक आणि त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक बाबींवर समग्र चर्चा झाली. ही बैठक रात्री नऊ वाजता संपली. जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीचे इतिवृत्त, आवश्यक तो पत्रव्यवहार, अर्जाचे नमुने आणि तत्सम दस्तऐवज आत्ताच तयार करा, अशा सूचना केल्या. सामाजिक न्याय विभागाचे साहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी निरीक्षक नाईक, सुभाष पवार यांचे सहकार्य घेतले आणि रात्री १० वाजता कागदपत्रे तयार झाली. लोंढे यांनी रात्री दोन वाजता कुठे येऊ अशी व्हॉटस‌्ॲपवरून विचारणा केली. रेखाराव यांनी त्यांना रात्री दोन वाजताच जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले. कागदपत्रे पाहिली, किरकोळ दुरुस्त्या केल्या आणि पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी त्यांनी सह्या केल्या.

दौलत देसाई यांच्या जागी आलेल्या रेखाराव यांनी १३ जुलैला कार्यभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच जिल्ह्यात महापूर आला. जिल्हाधिकारी कार्यालयच जिल्हा परिषदेत हलवावे लागले. याच दरम्यान त्यांनी रात्री दोन वाजता उजळाईवाडी विमानतळावर धाव घेऊन तेथील पाहणी केली होती. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबण्यास सुरुवात केली आहे. देसाई हे रजेवर गेल्यानंतर अनेक फायलींवर निर्णय झालेला नव्हता. त्यानंतर तातडीची नाहीत म्हणूनही अनेक प्रकरणांबाबत निर्णय होत नव्हता.

चौकट

हेपण आक्षेपार्हच...!

रेखाराव यांची ही कामाची पद्धती गतिमान असली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकेरी बोलावणे, माध्यम प्रतिनिधी, छायाचित्रकार यांचा अपमान करणे यांसारख्या त्यांच्या गोष्टी समर्थनीय नाहीत. आपण जसे काम करतो तसेच इतरांनीही करावे, यासाठीचा अतिरेकी अट्टहास धरण्याचीही आता वेगळी चर्चा सुरू आहे.

Web Title: Collector's work till three in the morning; Disposal of files

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.